बुलढाणा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मलकापूर–मुक्ताईनगर मार्गावरील हॉटेल महाराजा रेस्टॉरंटसमोर आज बुधवारी झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर तिघे जण गंभीर जखमी झाले. तिन्ही जखमीची प्रकृती गंभीर असून ते मृत्यूशी झुंज देत आहे. मलकापूर नजीकच्या तालसवाडा ते दसरखेड दरम्यान ही दुर्घटना घडली.

ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हडंबा थ्रेशर ट्रॅक्टर (क्र. एमएच 28 एझेड 3259) आज बुधवारी शेताकडे जात होता. दरम्यान राजस्थान नोंदणी क्रमांकाचा टाटा ट्रक (क्र. आरजे 29 जीबी 5676) भरधाव वेगात येऊन ट्रॅक्टरला मागून धडकला. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धडक इतकी जबरदस्त होती की ट्रॅक्टरचा मागील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला.

शिवसेनिक मदतीला

या अपघातात बाळकृष्ण त्र्यंबक पाचपोर (वय ५०, रा. धरणगाव) आणि रोहन किसन पाटील (वय २६) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत राजू नेरकर (वय ५०), मंगेश विकास पाटील (वय ३०) आणि आकाश रामचंद्र सोनटक्के (वय २८) हे गंभीर जखमी झाले आहें सर्व जखमीना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासह एएसआय विजय टेकाडे, गजानन बावस्कर, राजू साठे, बंटी कोलते, संदेश शिंदे, निलेश बोंडे आणि अश्विन साठे यांनी मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला.

मृतदेह ट्रॅक्टरमध्ये अडकला

अपघातात ट्रॅक्टरमध्ये अडकलेल्या मृतक बाळकृष्ण पाचपोर यांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर मदतकार्य केले. अपघातानंतर महामार्ग पोलीस, तब्बल एक तास उशिराने घटनास्थळी पोहोचल्याची माहिती समोर आली. याबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत पोहोचणे अपेक्षित असताना विलंब झाल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान, दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा व बचावकार्य करण्यात आले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून काही वेळाने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

ट्रकचे चालक व वाहक फरार

अपघातानंतर अंधाराचा फायदा घेत ट्रकचे चालक व वाहक घटनास्थळावरून पसार झाले. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहेत.