बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील कोराडी मध्यम सिंचन प्रकल्पाच्या परिसरात पाणी पुरवठा योजनेसाठी खोदलेल्या खड्ड्यात पाय धुण्यासाठी उतरलेल्या दोन निष्पाप बालकांचा खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

आज सापडला एकाचा मृतदेह

शनिवारी रात्री उशिरा एका मुलाचा मृतदेह सापडला, तर दुसऱ्याचा मृतदेह आज, रविवारी (९ ऑगस्ट) रोजी सकाळी बाहेर काढण्यात पथकाला यश आले. आयान राजू शेख (वय १०, राहणार देऊळगाव माळी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा ) आणि आवेद इब्राहिम शेख (वय ११, राहणार लोणार, जिल्हा बुलढाणा ) अशी मृत मावस भावांची नावे आहेत. या दुर्घटनेमुळे देऊळगाव माळी आणि लोणार परिसरात शोककळा पसरली असून संतप्त ग्रामस्थांनी जबाबदार कंत्राटदारावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे.

अंदाज चुकला अन घात झाला

आयान आणि आवेद हे दोघे शेख आसिफ शेख हुसेन यांच्यासोबत कोराडी धरणावर गेले होते. या ठिकाणी देऊळगाव माळी, सुलतानपूर आणि लोणार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांचे ‘प्लांट’ आहेत. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार कंत्राटदाराने या परिसरात १५बाय ४५ आकाराचा खाण सदृश्य मोठा खोल खड्डा खोदला होता. काम पूर्ण झाल्यानंतर हा धोकादायक खड्डा बुजवणे अथवा तेथे संरक्षक कुंपण घालणे बंधनकारक असतांना, कंत्राटदाराने तो उघडाच सोडून दिला.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

धरणाचे पाणी या खड्ड्यात साचल्यामुळे पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने मुले तेथे पाय धुण्यासाठी उतरली आणि थेट खोल पाण्यात ओढली गेली. सोबत असलेल्या शेख आसिफ यांनी प्रसंगावधान राखून एका मुलीला सुरक्षित बाहेर काढले, मात्र दोन्ही मुले पाण्याच्या तळाशी गेली. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. काल शनिवारी मध्यरात्री १२ वाजता मेहकरच्या माळीपेठ येथील युवकांनी आयान शेख याचा मृतदेह बाहेर काढला. दुसऱ्या बालकाचा मृतदेह रविवार सकाळी पाणबुडीवाले कृष्णा लक्ष्मण आगळे व माऊली आगळे( रा. पैठण) यांच्या खाजगी पथकाने बाहेर काढला. कंत्राटदाराने सुरक्षेचा कोणताही इशारा किंवा सूचना फलक न लावल्यानेच या दोन निष्पाप बालकांचा बळी गेल्याचा आरोप पीडित कुटुंबीय व ग्रामस्थांनी केला आहे. कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे.