बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील घाटबोरी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणारे आदिवासीबहुल नागेशवाडी हे गाव शासन प्रशासनाच्या दरबारीं उपेक्षितच आहे. यामुळे गाव प्रगती, विकासापासून कोसो दूर आहे. अशा या गावातील रहिवाशांसमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे.
गावात दूषित पाण्यामुळे डायरीयाची साथ पसरली आहे. घरोघरी गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून येत असून, आजमितीस शंभरावर रुग्णांची नोंद झाल्याचे वृत्त आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी याची पुष्टी केली आहे. दरम्यान गावात आरोग्य पथक गावात दाखल झाले. पथकाने पिण्याच्या पाण्याचे नमुने घेतले. मात्र, उपचारासाठी गावात कॅम्प लावला नसल्याने खासगी डॉक्टरांकडूनच उपचार करावे लागत असल्याची ओरड गावकऱ्यांकडून केली जात आहे.
साथ पसरण्याची चिन्हे
आरोग्य विभागाने वेळीच ही साथ आटोक्यात आणली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जावू शकते, अशी शंका रूपी शक्यता वर्तविली जात आहेत. मेहकर तालुक्यातील आदिवासीबहुल अशा नागेशवाडीमध्ये मागील काही दिवसांपासून डायरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. घरोघरी असणाऱ्या रुग्णांची संख्या शंभरपेक्षा जास्त झाली आहे. संडास, उलट्यांच्या त्रासामुळे गावकरी खासगी डॉक्टरकडे उपचार करवून घेत आहेत. गावात डायरियाची लागण झाल्याची माहिती राजेश नवले यांनी दिल्यानंतर १४ मे रोजी आरोग्य विभागाच्या सीएचओ डॉ. गवळी आरोग्य सेविका व आरोग्य सेवक यांनी यांनी नागेशवाडी येथे जाऊन पाण्याच्या स्त्रोताची माहिती घेतली. काही रुग्णांना औषधी दिली आणि पाण्याचे नमुने घेतले. मात्र मोठ्या प्रमाणावर डायरियाची लागण झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी अस्थायी स्वरूपाचे कॅम्प लावण्यात आले नाहीत.त्यामुळे दिवसेंदिवस डायरीयाचे रुग्ण वाढत आहेत.
पाण्याचे नमुने घेतले
घाटबोरी गट ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या टेंभूखेड, नागेश वाडी या गावांतील विहिरीत टेंभूखेड धरणावरून पाणी सोडले जाते. कोणत्याही प्रकारे शुद्धीकरण न करता गावकरी पितात. अशातच नागेश वाडीमध्ये डायरीयाची लागण झाली. नागेश वाडी येथे डायरियाची लागण झाली. रुग्णांना औषधी देऊन तसेच पाण्याचे नमुने घेतल्याचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गवई यांनी सांगितले.
दुसरीकडे ग्रामपंचायत सदस्य शीतल राजेश नवले यांनी संताप व्यक्त केला. आरोग्य सेवक, सेविका, आशा सेविका ह्या जर नियमित गावात आल्या व घरोघरी भेटी दिल्या तर अशाप्रकारे मागील कित्येक दिवसापासून जी डायरी याची लागण झाली आहे त्याची माहिती आरोग्य विभागाला वेळीच मिळाली असती. मात्र तसे झाले नाही आरोग्य विभागाला माहिती द्यावी लागली तर आरोग्य विभागाने नियमित पाण्याचे नमुने घ्यायला हवेत.
