बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका आज शुक्रवारी एका भीषण घटनेने अक्षरशः हादरला! भरदिवसा एका युवकावर पाच जणांच्या टोळीने सिने स्टाईल हल्ला चढवून त्याची अमानुष हत्या केली. मोताळा तालुक्यातील धामण गाव बढे पोलीस ठाणे अंतर्गतच्या पोफळी शिवारात आज ही थरारक घटना घडली. हा रक्तरंजित थरार पोफळी विलास राजाराम चौधरी यांच्या शेत शिवार येथे घडला. अनिकेत निवृत्ती सुरडकर (वय ३२ राहणार पोफळी तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा )असे मृत युवकाचे नाव पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास चक्र फिरवून पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृतक आणि आरोपी हे एकाच गावातील आणि एकाच समाजाचे आहेत. त्यांच्यात नेहमी किरकोळ कारणावरून वाद व्हायचा. दरम्यान आज शुक्रवारी २७ फेब्रुवारी रोजी ५ आरोपींनी अनिकेत सुरडकर याला चौधरी यांच्या शेतात अडविले. जुन्या कारणावरुन वाद घातला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. पाच आरोपीनी अनिकेतला घेरून लाठ्या काठ्या, लोखंडी आसारीने डोक्यावर, पाठीवर, मानेवर, छातीवर, गळ्यावर आणि पायावर जबर वार जबर रक्तबंबाळ करीत बेदम मारहाण केली. यामुळे अनिकेत रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला आणि गतप्राण झाला .
याप्रकरणी मृत अनिकेतचा चुलत भाऊ विजय सुरडकर याने धामणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी पोफळी येथील आरोपी ब्रम्हानंद ऊर्फ धम्मा राजाराम सुरडकर (वय ३४) लकी ऊर्फ प्रफुल्ल संतोष इंगळे वय ( २२ वर्ष) कृणाल जानराव सुरडकर, (वय २० वर्ष),निलेश बाळ बोदडे वय (३० वर्ष ). क्रिष्णा रमेश अंभोरे यांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध धामणगाव बढे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलम नुसार गुन्हे दाखल दाखल करण्यात आले. याप्रकरणी ठाणेदार नागेश जायले तपास करीत आहेत.
गुन्हेगारीचा वाढता आलेख
जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हे वाढत आहे. गुन्ह्याचा हा वाढता आलेख जिल्ह्यातील नागरिकांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. कायद्याचा धाक उरला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आजही एका युवकाची हत्या करण्यात आली. मृत युवक आणि पाचही आरोपी तिशीतील असल्याचे गंभीर चित्र आहे.
