बुलढाणा : एकीकडे सर्वत्र पवित्र रमजान महिन्याचा उत्साह, उपवास आणि सर्व शक्तिमान ईश्वराची इबादत सुरू असतानाच, एक अत्यंत धक्का दायक आणि तितकीच हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या एका तरुण क्रेन ऑपरेटरने मृत्यूला कवटाळले आहे.
विशेष म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने स्वतःच्या हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. “मेरी माँ और बच्चों का खयाल रखना”, असे हातावर लिहून सलमान खान अमीर खान पठाण या तरुणाने जगाचा निरोप घेतला. यामुळे समाज मन सुन्न झाले आहे.
बुलढाणा तालुक्यातील
शिरपूर येथील रहिवासी असलेले सलमान खान आमिर खान हे क्रेन चालक (ऑपरेटर )म्हणून काम करत होते. गेल्या ५-६ दिवसांपासून ते मोताळा तालुक्यातील गोसिंग गावात सरोदे यांच्या शेतात विहिरीच्या कामावर हायड्रा क्रेन मशीन चालवत होते. मात्र, मंगळवारी संध्याकाळी सलमान खान यांनी क्रेनलाच लटकून गळफास घेतल्याची धक्कादायक बातमी समोर आली. यामुळे गोसिंग परिसरासह मोताळा तालुक्यात एकच खळबळ उडाली. त्यांचे मूळ गाव असलेल्या शिरपूर मधील त्यांचे नातेवाईक आणि गावकरी हादरले. वृद्ध माता आणि पत्नीवर दुख्खाचा डोंगर कोसळला.
संघर्षाने मृत्युनंतरच सोडली पाठ
सलमान खान यांचे आयुष्य संघर्षाने भरलेले होते. लहानपणापासून संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला. मिळेल ती कामे करून त्यांनी घरच्यांना मदत केली. परिश्रम पूर्वक क्रेन चालविणे शिकले. मात्र एका अपघाता नंतर त्याच्या एका पायात ‘रॉड’ टाकलेला होता, ज्यामुळे त्यांना चालताना त्रास व्हायचा. तरीही, घरातली म्हातारी आई, पत्नी आणि लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी कष्टाची साथ सोडली नव्हती. वेदना सहन करून शारिरिक व्याधी असतानाही ते क्रेन मशीन ऑपरेटर म्हणून जोखीम पत्करून काम करत होते. अशा जिद्दी माणसाने अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून मर्ग दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार सुपडासिंग चव्हाण हे करीत आहेत.सध्या इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुरू आहे. संयम आणि प्रार्थनेच्या या महिन्यात अशी दुर्दैवी घटना घडल्याने मुस्लिम बांधवांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. मरण्यापूर्वी आपल्या हातावर लिहिलेला संदेश हा त्याच्या कुटुंबाप्रती असलेल्या ओढीचा पुरावा ठरला आहे.
आत्महत्या नव्हे काळेबेरे?
ही घटना केवळ आत्महत्या नसून त्यामागे काहीतरी वेगळे कारण असावे, असा खळबळजनक संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. सलमानचे चुलत भाऊ जाबीर खान दिलावर खान पठाण यांनी बोराखेडी पोलिसांत याप्रकरणी तक्रार दिली असून यात हा संशय व्यक्त केला आहे. घटनास्थळाची परिस्थिती आणि परिस्थितीची दाहकता पाहता, नातेवाईकांनी क्रेन मालक आणि कामावर हजर असलेल्या इतर मजुरांवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे.
घटनेच्या पुढील तपासात यातील सत्य बाहेर पडेल. दुसरीकडे एक कष्टकरी बाप, एक आधार देणारा मुलगा आणि आपल्या कामाशी प्रामाणिक असणारा (चालक) व्यक्ती दुर्दैवी स्थितीत कायमचा निघून गेल्याने शिरपूर गावावर शोककळा पसरली आहे. आता सर्वांचे लक्ष पोलीस तपासाकडे लागले आहे की, ही आत्महत्याच होती की यामागे काही गंभीर कारस्थान दडले आहे? याचा उलगडा तपासात होईल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे.
