बुलढाणा : अवर्षणग्रस्त म्हणून ओळख असलेल्या मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली गाव शिवारात राबविण्यात येत असलेल्या मियावाकी अर्थात जपानी पद्धतीच्या जंगल लागवड पद्धतीच्या हरित उपक्रमाला आज रविवारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. परिणामी, मागील पाच वर्षांपासून ग्रामस्थांच्या सहभागातून उभा राहिलेला हा प्रकल्प काही क्षणांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. परिश्रमपूर्वक वाढविण्यात आलेली शेकडो झाडें जळाल्याने वा क्षतीग्रस्त झाल्याने लवकर भरून न निघणारी नैसर्गिक वा पर्यावरणीय हानी झाली आहे. तसेच हजारो ग्रामस्थांचा हिरमोड झाला आहे.

हजारो ग्रामस्थांचा सहभाग

ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली मात्र हरित प्रकल्पचे मोठे नुकसान झाले. सिंदखेड लपालीचे सरपंच प्रवीण कदम यांनी ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे २० ते २५ एकर क्षेत्रात चर खोदून हजारो वृक्षांची लागवड केली होती. या व अन्य योजनामुळे सिंदखेड लपाली गावाने अमरावती विभाग आणि राज्य स्तरावर समृद्ध ग्राम अभियान मध्ये पारितोषिके पटकावली. गावातील हजारो ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला. या झाडांचे संगोपन ग्रामस्थांनी आपल्या पोटाच्या मुलांप्रमाणे केले होते. पावसाळ्यात पाणी अडवून जमिनीत मुरविण्याचे प्रयत्न केल्याने परिसरातील भूजल पातळीही वाढू लागली होती. विविध औषधी व उपयुक्त वनस्पतींची लागवड करून हा प्रकल्प परिसरासाठी आदर्श ठरत होता. मात्र आज लागलेल्या आगीमध्ये हिरवीगार झाडे, औषधी वनस्पती तसेच ठिबक सिंचनाचे असंख्य पाईप आणि इतर साहित्य जळून राख झाले.

आगीचे कारण अस्पष्ट

आग नेमकी कशी लागली, अपघात होता की कोणीतरी जाणीवपूर्वक लावली, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.