बुलढाणा : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथून पुणेकडे जाणाऱ्या ‘स्लीपर’ बसच्या दोन्ही चालकांनी कर्तव्यावर असताना मद्य प्राशन केल्याचे आढळून आले. केवळ दारूच न पिता या दोघांनी खामगाव बस आगारात धिंगाणा घातला. या घटनेचे वार्ताकन करणाऱ्या प्रसिद्ध माध्यम प्रतिनिधिसोबत त्यांनी अभद्र व्यवहार केला. यामुळे एसटी महामंडळाच्या या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमी अधिक दोन तास खामगाव बस स्थानकात रखडत बसावे लागले.
मद्यधुंद चालकांनी दोन तास प्रवाशांना वेठीस धरल्याने त्यांचे बेहाल झाले. बसचे वेळापत्रक कोलमडल्याने बस खामगाव बस स्थानक येथून सुमारे दोन तास उशिरा रवाना झाली. पुणे येथेही बस उशिरा पोहोचल्याने नोकरदार वर्गाची गैरसोय झाली.
राज्य परिवहन मंडळाची शयन सुविधायुक्त बस काल शुक्रवारी, १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता परतवाड्याहून पुण्याकडे निघाली होती.परतवाडा आगाराच्या शयनयान बसमधील चालक हा मद्य प्राशन करून बस चालवत असल्याचे धावत्या बसमधील प्रवाशांना आढळून आले. त्यावेळी बस ही खामगाव बस स्थानकात पोहोचली होती. लांब पल्ल्याचीअसल्याने परतवाडा आगारातीलच दोन बस चालक व दोन वाहक या बसमध्ये होते. यातील बस चालवणारा चालक व सहचालक हे दोघेही धावत्या बसमध्ये मद्यपान करत होते. या बसमध्ये देशी दारूच्या अनेक बाटल्या आढळल्या. चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता तर जालन्याहून दुसरा चालकही बस पुण्यापर्यंत चालवणार होता. तोही मद्यधुंद अवस्थेत बसमध्ये होता. दारूच्या बाटल्याही बसमध्ये आढळून आल्यात.
यावेळी या दोन्ही बस चालकांनी खामगाव बस स्थानकावर मोठा राडा घातला. यामुळे खामगाव बस आगार मधील वाहतूक नियंत्रक व अन्य कर्मचारी देखील त्रस्त झाले. अखेर हे मद्यधुंद चालक कुणालाच जुमानत नसल्याने खामगाव पोलिसांना बस स्थानकात पाचारण करण्यात आले. त्यामुळे बस ही दोन तास उशिराने पुण्याकडे रवाना झाली. चालकांच्या या राड्यामुळे मात्र प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला. यामुळे एस टी महामंडळंच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीद वाक्याचे अक्षरशः धिंडवडे उडाल्याचे दिसून आले. आत या चालकाविरुद्ध एस टी महामंडळं प्रशासन अथवा अमरावती विभाग नियंत्रक काय कार्यवाही करतात याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

