बुलढाणा : जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात धड व मुंडके छाटलेल्या महिलेच्या हत्या प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखे ऐवजी मेहकरचे उप विभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील पथके आता या आव्हानात्मक आणि गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास करणार आहे. या पथकाच्या तपासात काय पुढे येते, खरा आरोपी हाती लागतो याकडे जिल्हावासीयांसह खुद्द पोलीस विभागाचेही लक्ष लागले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेमुळे पोलीस दलाची नामुष्की!
खुनाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला. मात्र, हा तपास पोलीस दलाची नामुश्कि करणारा ठरला. चोर सोडून संन्याश्याला फाशी देणारा ठरला. स्थानिक गुन्हे शाखेने घाईघीसडीत किंबहुना बेजवाबदारपणे तपास करीत शिवानी नामक युवतीच्या (न झालेल्या) हत्येच्या आरोपवरून तिच्या बाप व भावाला अटक करून स्वतःची पाठ थोपटून घेतली.बाप आणि भावाने कथितरित्या हत्या केलेली शिवानी जिवंत असल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. यामुळे अनेक दिवस कारागृहात राहिलेल्या बापूराम कलमेकर आणि त्याचा मुलगा अजय याची सुटका करण्यात आली.
सहा अधिकारी कर्मचाऱ्यांची बदली
याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी स्थागुशा चे प्रभारी सुनील अंबुलकर, उप निरीक्षक पंकज सपकाळे, पोलीस जमादार एजाज खान, अमोल शेजोळ, आदिल रहमान परसूवाले यासंह जळगाव जामोद चे ठाणेदार नितीन पाटील यांची जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. या कारवाईने देखिल पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली.
खाडे यांच्या समक्ष कडवे आव्हान
आता हत्या झालेली महिला कोण? आणि आरोपी अर्थात तीचे मारेकरी कोण? हा आव्हानात्मक तपास आता मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.राज्यभर गाजत असलेल्या ‘धडा वेगळे शीर ‘ प्रकरणाकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. शिवानीचे वडील बापूराम कलमेकर व भाऊ अजय कलमेकर यांना तिच्याच हत्येच्या गुनात पोलिसांनी अटक केली होती. ती जिवंत असल्याने दोघांनाही कारागृहातून सोडावे लागले. हे प्रकरण आता पोलिसांच्या मानगुटीवर बसले आहे. पोलिसांसमोर या हत्योचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्याकडे हा तपास देण्यात आला आहे. संतोष खाडे यांनी नुकतेच चार वर्षांपूर्वी पुरलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा छडा लावला. या हत्येचा गुन्हा उघडकीस आणणारे खाडे आता मुंडके नसलेल्या धडाचा कसा तपास लावतात, याकडे सामान्य जनतेसोबतच उचलबांगडी झालेल्या पोलीस अधिकारी व जिल्हा पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.
विविध स्तरांतर घ्यावा लागणार शोध
घटनास्थळावरून १४ किलोमीटर अंतरावर मध्यप्रदेशची बॉर्डर लागते. या प्रकरणांमध्ये संतोष खाडे यांना सर्व बाजूने तपास करावा लागणार आहे. हत्या झालेली महिला मध्य प्रदेशातील आहे की आणखी कुठली, याचा शोध घ्यावा लागणार आहे. एकीकडे मध्य प्रदेशात सातपुडा पर्वताच्या दऱ्याखोऱ्या सोडून नदीकाठी खुल्या जागेत हा मृतदेह मुंडके व धड कापून का टाकण्यात आले, जे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने पकडले होते, त्यांचा यामध्ये काही सहभाग आहे का ? अशा अनेक बाजूंनी तपास करावा लागणार आहे.
