बुलढाणा : जिल्ह्यातील नागेशवाडी या आदिवासीबहुल गावात डायरियासदृश्य साथरोगाने थैमान घातले. याची तीव्रता तिसऱ्या दिवशी म्हणजे आज शनिवारी (दि. १६) देखील कायम आहे. गावातील रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी तब्बल ४५ आबालवृद्ध रुग्णांवर नजिकच्या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचार करण्यात येत आहे. डायरियाबाधित नागेशवाडी गावात आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी तळ ठोकून आहे. विविध प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत असून विविध नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

आरोग्य यंत्रणा खळबळून जागी

दरम्यान, मेहकर तालुक्यातील घाटबोरी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणारे नागेशवाडी गावात दूषित पाणी पुरवठ्यामुळे डायरियाची लागण झाली. रुग्णसंख्या शंभरच्या घरात गेली. घरोघरी रुग्ण असल्याने गावकरी हादरले. तालुक्यातील यंत्रणानी त्यांच्या परीने उपचार केले. मात्र याची माहिती मुख्यालयाला नसल्याचे दिसून आले.

यंत्रणा गावात

‘लोकसत्ता’ सह अन्य प्रसिद्धी माध्यमांत वृत्त उमटल्यावर जिल्हा आरोग्य विभाग खळबळून जागा झाला. काल शुक्रवारी संध्याकाळी जिल्हा स्तरावरील एक पथक जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे यांच्या माग्दर्शनात दाखल झाले. या पथकाने तातडीने कार्यवाही व उपाय योजना करीत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राशी समन्वय केला. अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कामाला लावले.

दोन केंद्रात उपचार

मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात १८ तर जानेफळ आरोग्य केंद्रात २७ रुग्णावर उपचार करण्यात येत आहे. यामध्ये लहान बालकांचा देखील समावेश असल्याचे वृत्त आहे. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.देऊळगाव साकर्षा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी गावात तळ ठोकून आहे. गावात व्यापक प्रमाणात सर्वेक्षण वजा पाहणी करण्यात येत आहे. तसेच जन जागृती करण्यात येत आहे. गावातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट

या घटनेची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसह जानेफळ आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यांनी रुग्णांची विचारपूस करुन दिलासा दिला. दुसरीकडे यंत्रणानी रुग्ण व गावातील पाण्याचे नमुने संकलित केले असून तपासणीसाठी पाठविले आहे.

यापूर्वी गावात दूषित पाण्यामुळे डायरियाची साथ पसरली. घरोघरी गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून येत असून, शंभरावर गावकरी बाधित झाले होते. नागेश वाडी या गावांतील विहिरीत टेंभूखेड धरणावरून पाणी सोडले जाते. कोणत्याही प्रकारे शुद्धीकरण न करता गावकरी पितात. यामुळे नागेश वाडीमध्ये डायरियाची लागण झाली.