बुलढाणा : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथील प्रजासत्ताकदिनाच्या ध्वजवंदन कार्यक्रमातील आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव टाळल्याने राज्यात रान पेटले आहे. आंबेडकरी चळवळीतील संघटना, कार्यकर्त्यांकडून त्यांचा निषेध व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीने रस्त्यावर येत मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी आपल्या भाषणातून घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज, २७ जानेवारीला वंचित आघाडीच्या वतीने शेगाव येथील तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
नाशिकमधील शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेख केला नाही. यावर तिथे उपस्थित असलेल्या माधवी जाधव या वनरक्षक महिला कर्मचाऱ्याने जाहीर आक्षेप नोंदवला. ‘संविधान आणि आंबेडकरांचे नाव संपवण्याचा हा प्रयत्न आहे’, अशा भावना व्यक्त करणारा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामुळे राज्यभरात प्रामुख्याने आंबेडकरी चळवळीत संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या आदेशानुसार आज २७ जानेवारीला शेगाव येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकत्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांचे मंत्रीपद तात्काळ काढून घ्यावे, अशी आक्रमक मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.
शेगाव तालुका अध्यक्ष प्रविण विरघट यांनी यावेळी सरकारवर जोरदार प्रहार केला. प्रजासत्ताकदिन म्हणजे संविधानाचा उत्सव आहे आणि त्याच दिवशी संविधानाच्या शिल्पकाराचे नाव न घेणे ही बाब महायुती सरकारची मानसिकता दर्शविणारी आहे. माधवी जाधव यांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे. वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
