बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील ११ पालिकांच्या निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम टप्पा सुरु आहे. मात्र अजूनही महाविकास आघाडी व महायुती चे घटक पक्ष एकत्र लढणार की मैत्री पूर्ण लढती होणार याचे चित्र अस्पष्ट आहे. अजूनही युती वा आघाडी कडून तशी घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे राजकीय सभ्रमाचे वातावरण असताना आज एक महत्वपूर्ण राजकीय घोषणा करण्यात आली आहे.
आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका काँग्रेस वंचित एकञ लढणार हा पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी या आशयची घोषणा केली.जिल्हा काँग्रेस समिती चे अध्यक्ष राहूल बोंद्रे यांनी आज शुक्रवार (दि. १४) नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथील पञकार भवन येथे घेतलेल्या पञकार परिषदेत हे जाहीर केले.
जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर काँग्रेस आणि वंचित एकञपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्याची सुरुवात बुलढाणा जिल्ह्यातून झाली असून, हाच युतीचा पर्टन राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी राहणार असल्याचे राहुल बोंद्रे यांनी सांगितले.
मोठे नेते नेते एकञ आले असल्याने साहजिकच आमच्या सारखे खालच्या पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी देखील एकञ येवून मोठ्या ताकदीने निवडणूकांना समोर जाण्याचे निश्चित केले आहे. यावेळी या आघाडीत उबाठा आपल्या सोबत आहे का? असा प्रश्न केला असता बोंद्रे यांनी ते देखील यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले. तसेच काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागापैकी काही जागा वंचितला देण्यात येतील.
स्थानिक पातळीवरील दोन्ही पक्षाचे शहराध्यक्ष,कुठली जागा कोणाला सोडायची हे ठरवतील. शाहू, फुले या विचारसरणीला धरुन झालेली ही आघाडी जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी झाली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्या वंचित बहुजन आघाडी सविता मुंढे, दत्ता काकस, रिजवान सौदागर, निलेश जाधव, प्रशांत वाघोदे, मिलिंद वानखेडे यांच्यासह काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
