बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरा येथे घडलेल्या आणि आता राज्यात गाजत असलेल्या बहुचर्चित ‘धड वेगळे शीर’ प्रकरणात निष्पाप आदिवासी पिता पुत्रास अडकवणाऱ्या बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या चार कर्मचाऱ्यांना अखेर सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे.
यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षक व तीन पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. यापूर्वी याच प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील यांची देखील जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेत मोठया प्रमाणावर कार्यवाही होण्याची ही अलीकडंच्या काळातील मोठी कारवाई ठरली आहे.
चौकशी अहवाल सादर…
पोलीस खात्याची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांना पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिले होते. श्रेणिक लोढा यांनी चौकशी अहवाल सादर केल्यानंतर पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनीतपासाशी थेट संबंध असलेल्या आणि बदली करण्यात आलेल्या चार कर्मचा्यांना निलंबीत केले. यामुळे बुलढाणा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
हे झाले निलंबीत
निलंबीत झालेल्या मध्ये पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलीस अंमलदार एजाज रफिक खान, अमोल रमेश शेजोळ आणि अजिस रेहमान परसुवाले यांचा समावेश आहे. यापूर्वी २९ मे रोजी त्यांची थेट नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार होती. ती आता कोसळली आहे.
काय आहे प्रकरण?
जळगाव पोलीस ठाणे हद्धीतील राजुरा शिवारात २६ एप्रिल रोजी एका अज्ञात तरुणीचा शिर नसलेला आणि अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेजबाबदारपणा दाखविला प्रदर्शन घडवले. मध्यप्रदेशातील खकनार येथून बेपत्ता असलेली तरुणी शिवानी कलमेकर हिचाच हा मृतदेह असल्याचे भासवत, एलसीबीने शिवानीच्या निष्पाप वडील आणि भावाला खुनाच्या आरोपाखाली अटक केली . पोलिसांनी ज्या तरुणीच्या हत्येचा कथित तपास पूर्ण करून तिच्या नातेवाइकांना तुरुंगात धाडले होते, तीच शिवानी कलमेकर २८ मे रोजी चक्क सुखरूप आणि जिवंत पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली.
पोलीस दलाची नाचक्की
मृत मानलेली मुलगी जिवंत समोर आल्याने एलसीबीच्या तपासाचे अक्षरशः धिंडवडे निघाले. ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी उपरोक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश श्रेणिक लोढा यांना दिले . अहवालात दोषी आढळल्यानंतर अखेर या चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
माहिती देणाऱ्यास ५० हजाराचे बक्षीस
दरम्यान राजूरा येथे सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवून देणार्याला पन्नास हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. राजूरा खुर्द शेत शिवारातील आसोफ हमीद मुल्लाानी यांच्या शेताच्या धुऱ्यावरील निंबाच्या झाडाजवळील नदीच्या काठावर एका अज्ञात स्त्री जातीचे शिरच्छेद केलेले आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत मिळून आले होते . अज्ञात आरोपींनी सदर महिलेचा अत्यंत क्रूरपणे खून करून तिची ओळख पटू नये, या उद्देशाने प्रेत जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्यापपर्यंत या मृत महिलेची ओळख पटलेली नसून, पोलीस प्रशासनाकडून सर्व जनतेला तिची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
