बुलढाणा : डाक विभागाने अलीकडे कात टाकलीय. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध उपक्रम राबविण्यावर डाक विभागाने भर दिला आहे. अगदी विदेशाताही दिवाळी फराळ, राखी पाठविणे हे उपक्रम याचे मासलेवाईक उदाहरणे होय. मात्र आता डाक विभागाने काहीसा कळस गाठत चक्क गंगा जल विक्रीचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची दाट शक्यता आहे.

गंगा नदीला महत्व

गंगा नदीला भारतीय संस्कृतीमध्ये धार्मिक व आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. विविध धार्मिक विधी, पूजा, संस्कार तसेच अन्य धार्मिक प्रसंगी गंगाजलाचा वापर केला जातो. नागरिकांना सहजपणे गंगाजल उपलब्ध व्हावे, यासाठी डाक विभागाच्या माध्यमातून आता पोस्ट ऑफिसमध्ये गंगाजल विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचे विशिष्ट समुदायात स्वागत होणार असले तरी इतर समुदायचे काय? असा प्रश्न भविष्यात उद्भण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मंदिरात स्टॉल!

बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधून २५० मिली गंगाजलाची बाटली केवळ ३० रुपयांत खरेदी करता येणार आहे. त्यामुळे गंगाजल मिळविण्यासाठी दूरच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही.

भारतीय डाक विभागाकडून नागरिकांच्या दैनंदिन गरजा, श्रद्धा आणि सुविधांशी संबंधित विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून पोस्ट ऑफिसमध्ये गंगाजल उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच श्रावण सोमवारच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध प्रमुख मंदिरांमध्ये गंगाजलाचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. अधीक्षक डाकघर गजेंद्र जाधव यांनी ही माहिती दिली आहे.