बुलढाणा : जुनच्या तिसऱ्या आठवड्यापासून पावसाने नियमित हजेरी लावली आहे. जुलैमध्येदेखील बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. आजवर झालेला पाऊस समाधानकारक असून यामुळे खरीपाच्या पेरण्या अंतिम टप्यात असल्याने पीक पाण्याची परिस्थिती चांगली आहे. मात्र जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातही पाणीटंचाईचे संकट कायम असून जिल्ह्यातील बहुतेक धरणे तहानलेलेलीच असल्याचे परस्परविरोधी चित्र आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांची चिंता तूर्तास दूर झाली असली प्रसाशानाची डोकेदुखी कायम असल्याचे चित्र आहे.
दोन तालुक्यात पावसाचे ‘दि्वशतक’
जून महिन्यात उशिरा आगमन झालेल्या पावसाने नंतर तूट भरून काढली. नियमितपणे बरसणाऱ्या पावसामुळे मेहकर (२३९ मिमी) आणि बुलढाणा (२०४ मिमी ) या तालुक्यात पावसाने दि्वशतक ओलांडले आहे. उर्वरित दहा तालुक्यात १२१ ते १७४ मिमी दरम्यान पावसाची नोंद झाली आहे. केवळ मलकापूर तालुक्यातील( ९१.६ मिमी) पाऊस चिंताजनक आहे. जिल्ह्यात आज अखेर सरासरी १५९ मिमी पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरी (७६१. ६ मिमी)च्या तुलनेत २१ टक्के इतकी आहे.
पेरण्या अंतिम टप्प्यात
दुसरीकडे खरीप पिकाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहे. आजअखेर सव्वासहा लाख हेक्टरच्या आसपास पेरण्या आटोपल्या आहे. जिल्ह्याचे खरीप पिकाखालील पेरा क्षेत्र ७.३० लाख हेक्टर आहे. पाऊस उशिरा आल्याने सोयाबीनचा पेरा पावणेचार लाखाच्या आसपास झाला आहे. याखालोखाल कपाशीचा पेरा असून उडीद, मुंग च्या पेऱ्यात घट होण्याची चिन्हे आहेत.
टँकरची धडधड कायम
पाऊस समाधानकारक असला तरी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातही जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट कायम आहे. जिल्ह्यातील ५४ गावांना अजूनही ५८ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. ग्रामीण भागातील १ लाख २२ हजार ५५६ गावकऱ्यांची तहान टँकरद्वारे भागविली जात आहे. अकरा तालुक्यातील २५७ गावाना २९५ खासगी अधिग्रहित विहिरीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे एकीकडे पेरणीची धामधूम सुरू असताना कमिअधिक दोन लाख ग्रामस्थांचे टंचाईमुळे होणारे हाल जुलैच्या पुर्वार्धातदेखील कायम आहे.
सिंचन प्रकल्पांची जलपातळी वाढेना
दुसरीकडे धरण क्षेत्रात झालेल्या अपुऱ्या पावसामुळे अपवाद वगळता ५१ लहान मोठ्या धरणातील जलपातळी अजूनही असमाधानकारक असल्याचे चित्र आहे. मोठ्या धरणापैकी खडकपूर्णा धरणात ४५.५१७६ दलघमी इतका मृत जलसाठाच आहे. पेनटाकळीमध्ये ३८ तर नळगंगा मध्ये ५२ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. सात मध्यम प्रकल्प पैकी, पलढग १२.६५, तोरणा १३.४३, मन २४.२७, मस २६.४०, कोराडी ४०.६१, उतावळी ४२. ७० आणि ज्ञानगंगा ४५ मधील जलसाठा समाधानकारक नाही. ४१ लघु प्रकलपात देखील अशीच स्थिती आहे.
