बुलढाणा : सध्याच्या काळात मोबाईलचे वेड आणि रिल काढण्याचा नाद याने कळस गाठला आहे. या नादात अनेकांचे जीव गेले आहे. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या व लहान मोठ्या अपघातासाठी कुप्रसिद्ध समृद्धी महामार्गवर एका खाजगी बस चालकाच्या रिलच्या नादात दुर्घटना घडली आणि त्यात एका निष्पाप बालकाचा मृत्यू झाला तर तब्बल १७ प्रवासी जखमी झाले. यातील ३ प्रवासी गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. मेहकर पोलीस ठाणे हद्धीतील फरदापूर टोल नाक्याजवळ ही दुर्घटना घडली.
समृद्धीवर विचित्र अपघात
बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी समृद्धी महामार्गावर मेहकर नजिक रविवारी, १९ एप्रिल रोजी हा भीषण अपघात घडला. मुंबईहून पुसदकडे जाणारी खाजगी प्रवासी बस मेहकर टोल नाक्याजवळ अपघातग्रस्त झाली. या दुर्घटनेत सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १७ प्रवासी जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, बसचा चालक हा मोबाईलवर रील बनवण्यात व्यस्त होता , त्यामुळे भरधाव ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन होऊन उलटली. बस उलटत नाही तोच एका कारने बसला धडक दिली. यामुळे अपघाताची तीव्रता वाढली असतांना कारचे देखील मोठे नुकसान झाले.
मृत बालक यवतमाळचा
अपघातानंतर जखमीना मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमीना अन्यात्र हलविण्यात आले. या घटनेत ट्रॅव्हल्स (एम एच २९ बी २३३३ ) आणि कार (एम एच ४० ईडी १३४८ ) ची मोडतोड झाली.ट्रॅव्हल्स मध्ये ३० प्रवासी होते. यातील पियुष यशपाल राठोड(वय ६ वर्षे, रा. दिग्रस जिल्हा यवतमाळ ) या बालकाचा जागीच मृत्यू झाला. सतरा प्रवासी जखमी झाले. यामध्ये अस्वद अहमद महबूब अहमद, वय ११ वर्षे, रा. वसंत नगर पुसद, जि. यवतमाळ, सुशील खडसे, रूपचंद गजानन बावनकुळे हे गंभीर जखमी आहेत. वैभव श्रीधर धुळे, वय २४ वर्ष, रा. पुसद बालतुर रेल्वे. शांती संजय जाधव, वय ३० वर्ष, रा. सोमेश्वर नगर डिग्रस, जिल्हा यवतमाळ, विजय बाबुराव राठोड, वय ५० वर्षे रा. विक्रोळी मुंबई. किरण यशपाल राठोड, आशा देवकर, किशन चव्हाण, वय २२वर्षे, रा.पांडुर्णा, पुसद,मैफूज अहमद, वय ४८वर्षे, रा. वसंत नगर, पुसद. कु. उमीहाणी अहमद, वय ४ वर्ष, रा. वसंत नगर, पुसद. योगिता रूपचंद बावनकुळे, अविनाश राठोड, राजेश चव्हाण, लवकित चव्हाण पूजा राठोड, कुमारी ध्रुवी राठोडहे किरकोळ जखमी आहेत.
जखमीवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातमुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यामुळे फरदापूर टोल नाक्याच्या दूतर्फ वाहनाच्या दीर्घ रांगा लागल्या.पोलिसांनी दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
