बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यातील टुणकी–लाडनापूर रोडवर बोलेरो आणि मोटरसायकलची भरवेगात धडक झाल्याने दुचाकीवरील चिमुकलीसह आईचा मृत्यू झाला. तसेच मामा आणि भाचा गंभीर जखमी झाले असून ते मृत्यूशी झुंज देत आहे. या अपघातानंतर संतप्त जमावाने चालकाला बाहेर काढून चारचाकी (बोलेरो) वाहन पेटवून दिले. यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला. सोनाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

जोरदार धडक

काल शुक्रवारी रात्री ही भीषण दुर्घटना घडली . या प्रकरणी बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, संग्रामपूर तालुक्यातील राज्य महामार्ग क्र. ४७ वरील टुणकी–लाडनापूर मार्गावर लाडणापुर फाटा येथे ही दुर्घटना घडली. बोलेरो वाहन आणि मोटरसायकल यांच्यात जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दुचाकी कमी अधिक २०० फूट हवेत भिरकावली गेली. यात एक वर्षीय चिमुकलीचे धड व शरीर अलग झाले. तीची आई, भाऊ आणि मामा गंभीर जखमी झाले. यापैकी आईचा थोड्याच वेळाने मृत्यू ओढवला. उर्मी उर्फ पूर्वी संजय वास्कले (वय १ वर्षे) सपना संजय वास्कले (वय २८ वर्षे दोन्ही रा. जसाँदी तालुका शाहपुर जिल्हा बुरहानपुर मध्य प्रदेश ) अशी मृत आई मुलीची नावे आहे. सनविर संजय वास्केले (वय ३वर्षे रा. जसाँदी ला. शाहपुर जि. बुरहानपुर म.प्र.) आणि कमलेश भुरा चंगळ ( राहणार बोरवा तालुका तेल्हारा जिल्हा अकोला) अशी गंभीर जखमी मामा भाच्याची नावे आहे.

रक्षाबंधनसाठी निघाले, काळाने गाठले

सपना संजय वास्केले या आपला भाऊ कमलेश भुरा चंगळ यांच्यासह रक्षाबंधनसाठी तेल्हाराकडे मोटार सायकलने निघाल्या होत्या. तीचे सह मुलगा सनविर व मुलगी कु.उर्मी देखील होते. माहेरी रक्षाबंधन सनाकरीता बोरवा जि. अकोला येथे मोटर सायकलने जात असतांना टुनकी ते लाडणापुर मार्गावर विरुध्द दिशेने येणाऱ्या बोलेरो क चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व बेदरकारपणे चालवून दुचाकीला धडक दिली. यामुळे दोघा मायलेकीचा मृत्यू झाला तर मामा भाचे गंभीर जखमी झाले.हिरालाल अनारसिंग वास्कले (वय 37 वर्ष, रा. उसरा ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा ) यांच्या तक्रारीवरून बोलेरो चालक रवी गोखले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास सोनाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप काळे करीत आहे