बुलढाणा : छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या वाचनावरून बुलढाण्यात सलग दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. युवक काँग्रेस आणि आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये बुधवारी आमनेसामने परिस्थिती निर्माण झाली; मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने संभाव्य संघर्ष टळला.
मंगळवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षासह डाव्या संघटनांनी गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन छेडले होते. त्या पार्श्वभूमीवर शहरात आधीच तणावाचे वातावरण होते. बुधवारी युवक काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सार्वजनिक वाचन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात संदीप शेळके, दत्ता काकस, विश्वजित पडोळ, शिवराज पाटील, रिजवान सौदागर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रम सुरू असतानाच आमदार गायकवाड यांचे समर्थकही घटनास्थळी जमा झाले आणि दोन्ही गटांमध्ये घोषणाबाजी सुरू झाली.
शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी आणि युवक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणा युद्ध रंगले. शिव स्मारक परिसर आणि संगम चौकात काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याने संघर्षाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करत दोन्ही गटांना पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा संघर्ष टळला. घटनेनंतर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, शहरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
