बुलढाणा : रक्षकानेच कायद्याचे भक्षक बनावे आणि कायद्याच्या रक्षकावरच हात उचलण्याची विचित्र आणि तितकीच खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनाक्रमात मारहाण करणारे पोलीस कर्मचारी अकोला जिल्ह्यातील असून निमूटपणे मार खाणारे पोलीस दादा बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आहे. यामुळे आता अकोला पोलीस अधीक्षक या कर्मचाऱ्यावर काय आणि कधी कार्यवाही करतात याकडे दोन्ही जिल्ह्याच्या पोलीस दलाचे आणि कायदा प्रेमी नागरिकांचे लक्ष लागले आहे.

काय झाले नेमके ?

संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या कवठळ शेत शिवारात एका घटनेने बुलढाणा व अकोला पोलीस दल हादरून गेले आहे . कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने केवळ विचारणा केली म्हणून पोलीस कर्मचाऱ्यानेच मारहाण करत ‘खाकी’ला काळीमा फासण्याचे काम केले आहे.तामगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संतोष तुळशीराम आखरे (वय ५१ वर्षे) आणि प्रमोद मुळे हे मध्यरात्रीच्या सुमारास शासकीय वाहनाने पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्त (पेट्रोलिंग ) घालत होते. याच दरम्यान कवठळ शेत शिवारात काही लोक ‘गुप्तधन’ काढण्यासाठी विधी करत असल्याची गुप्त माहिती तामगावचे ठाणेदार पंडितराव सोनवणे यांना मिळाली. सोनवणे यांनी माहितीच्या पडताळण्यासाठी आखरे आणि मुळे यांना घटनास्थळी पाठवले. मात्र, सदर ठिकाणी असा कोणताच प्रकार आढळून आला नाही.

उपरोक्त पोलीस अंमलदार परत जात असताना त्यांना रस्त्यात दोन संशयास्पद व्यक्ती दिसल्या. त्यावेळी आखरे यांनी ‘एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करत आहात?’, असा प्रश्न विचारला. याचा राग मनात धरून आरोपी राजेश गव्हाळे (वय ४२ वर्षे) आणि त्याचा भाऊ मनोज गव्हाळे (वय ३८ वर्षे) यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. पोलीस अंमलदार आखरे यांना अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, हातातील स्टीलच्या कड्याने आखरे यांच्या पाठीवर आणि कपाळावर जोरदार वार केले.

या हल्ल्यात आखरे रक्तबंबाळ झाले. साक्षीदार पोलीस अंमलदार मुळे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी संतोष आखरे यांच्या तक्रारीवरून तामगाव पोलिसांत उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी राजेश गव्हाळे व मनोज गव्हाळे हे अकोला पोलीस दलात अंमलदार म्हणून कार्यरत आहेत, हे विशेष. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार पंडितराव सोनवणे हे करत आहेत.

कायद्याचे तीन तेरा

ज्या पोलीस दलाने जनतेचे रक्षण करायचे, त्याच दलातील एक कर्मचारी जेव्हा दुसऱ्या जिल्ह्याच्या पोलिसावर हल्ला करतो, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे . आरोपी मनोज गव्हाळे याला पोलीस नियमावलीची माहिती असतानाही त्याने हे कृत्य केले. त्यामुळे पोलीस विभागाची प्रतिमा डागळाली आहे.अकोला पोलीस दलातील त्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळणार का? याकडे आता बुलढाणा व अकोला पोलीस दलासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.