बुलढाणा : सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या व गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला कलंक फासणाऱ्या एका शिक्षकाने चिमुकल्या विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचे उघडकीस आल्याने पालकांनी बुधवारी त्याला चांगलाच चोप दिला. यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. डोणगाव पोलीस ठाणे अंतर्गतच्या लोणी गवळी (तालुका मेहकर) येथे हा लज्जास्पद व तितकाच खळबळजनक घटनाक्रम घडला.

यामुळे डोणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कायदा सुव्यवस्थाची संभाव्य स्थिती लक्षात घेता गावात राखीव पोलीस दलाला देखील पाचरण करण्यात आले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून तणाव निवळला आहे. मात्र विकृत शिक्षकांविरुद्ध पोलीस व प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी संतप्त पालक आणी गावकऱ्यांतून होत आहे.

शिक्षकाला ग्रामस्थांकडून चोप

मागील अनेक दिवसापासून सुरु असलेला हा विकृत प्रकार बुधवार, ८ एप्रिल रोजी उघडकीस आला. हे प्रकरण समजताच संतप्त ग्रामस्थांनी शाळा गाठून शिक्षकाला चांगलाच चोप दिला. मेहकर तालुक्यातील लोणी गवळी येथे ही घटना घडली. महादेव आत्माराम मानतोडे (वय ५८) असे यानराधम व विकृत शिक्षकाचे नाव आहे.

लोणी गवळी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकाने तिसऱ्या वर्गातील तीन मुलींचा विनयभंग केला. चालू वर्षात येत्या जून महिन्यामध्ये हा शिक्षक सेवानिवृत्त होणार होता. मात्र त्याने विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन करून कारकिर्दीला आणि शिक्षकी पेशाला बट्टा लावला.

काय आहे घटनाक्रम?

मागील काही काळापासून त्याच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या काही मुलींसोबत हे घाणेरडे कृत्य या शिक्षकाने केले. या प्रकाराबद्दल कुठे काही वाच्यता केल्यास तो जीवाने मारण्याच्या धमक्या द्यायचा. यामुळे भयभीत झालेल्या मुलींनी ही घटना कोणाला सांगितली नाही. दरम्यान, ८ एप्रिल रोजी या विकृताने तीन मुलींसोबत लैंगिक चाळे केले. त्यांना कपडे उतरायला लावले असा आरोप आहे. मात्र यावेळी भीती झुगारून शिक्षकाच्या या कृत्याबद्दल मुलींनी आपल्या आई, वडिलांना ही घटना सांगितली. संतापलेल्या पालकांनी शाळा गाठून मास्तरची चांगलीच धुलाई केली.

घटनेबद्दलची माहिती समजताच डोणगाव पोलीस स्टेशनचे डोणगाव ठाणेदार अमरनाथ नागरे आपल्या सहकाऱ्यांसह शाळेत पोहोचले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे हेदेखील दाखल झाले. राखीव पोलीस दलसुद्धा पोहोचले. यावेळी शाळा आणि गावात तणाव निर्माण झाला. उपविभागीय अधिकारी खाडे यांनी पालकांची समजूत काढली. आरोपी शिक्षकाला डोणगाव पोलीस ठाण्यात देण्यात आले.

परिस्थिती नियंत्रणात

याप्रकरणी डोणगाव पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.येत्या तीन महिन्यांनी जूनमध्ये हा शिक्षक सेवानिवृत्त होणार आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच त्याने विद्यार्थिनींशी विकृत चाळे केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे गावातील तणाव आता निवळला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे डोणगाव पोलिसांनी सांगितले.