बुलढाणा: जीवन मृत्यू मध्ये पुसट रेषा असते. ज्याची वेळ येते त्याचा मृत्यू अटळ आणि एखाद्याचे मरण टळायचे असले तर तो कोणत्याही कारणाने वाचतो असे म्हणतात. याचा भीषण प्रत्यय आणणारा घटनाक्रम जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील जळगाव जामोद तालुक्यात घडला

काळ आला पण…

मित्र नदीच्या पात्रात बुडू लागल्याचे दिसताच क्षणाचाही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतलेल्या दोन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला. जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा खुर्द शिवारात बेंबळा नदीच्या पात्रात काल रविवारी संध्याकाळी सुमारे ही हृदयद्रावक घटना घडली. धीरज विजय गवई (वय २२) आणि अविनाश राजेश सावळे अशी मृत तरुणांची नावे आहेत. दरम्यान, पाण्यात बुडत असलेल्या संघर्ष अरुण गवई याचे प्राण वाचले. या घटनेने निंभोरा खुर्द परिसरावर शोककळा पसरली आहे.

काय झाले नेमके?

मिळालेल्या माहितीनुसार, निंभोरा खुर्द येथील गजानन हरिभाऊ शिरसाट यांच्या भाच्याचा मुलगा धीरज विजय गवई हा आपला चुलतभाऊ संघर्ष अरुण गवई तसेच नातेवाईक अविनाश राजेश साबळे यांच्यासोबत गुरे चारण्यासाठी निंभोरा खुर्द शिवारात गेला होता. गुरांना पाणी पाजण्यासाठी तिघेही बेंबळा नदीकाठी गेले होते.

यावेळी संघर्ष गवई अचानक नदीच्या पाण्यात बुडू लागला. त्याला पाण्यात बुडताना पाहताच धीरज गवई आणि अविनाश सावळे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बचावासाठी गेलेले धीरज आणि अविनाश हे दोघेही पाण्यात बुडाले. संघर्षचे प्राण वाचले; मात्र त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या दोघांना आपला जीव गमवावा लागला.

परिसरावर शोककळा

घटनेची माहिती परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे निंभोरा खुर्द परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, याप्रकरणी गजानन हरिभाऊ शिरसाट यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात कलम १९४ बीएनएस अन्वये नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहे.