बुलढाणा : महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीचे संस्थापक रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवारी, ३ ऑगस्टला बाधित आणि फसवणूकग्रस्त शेतकऱ्यांचा मलकापूर उपविभागीय कार्यालयावर धडक आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमाने रविकांत तुपकर दीर्घ काळानंतर मलकापुरात रस्त्यावर उतरल्याने हा मोर्चा लक्षवेधी आणि चर्चित ठरला.

शेतकऱ्यांना गेल्यावर्षीचा १०० टक्के पीकविमा मिळावा तसेच नुकसान भरपाई मिळावी, जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी शेतीला कुंपण (कंपाऊंड) मिळावे, वन्यप्राण्यांनी शेतापिकांच्या केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी, गेल्यावर्षीचा सोयाबीन-कापसाला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये भाव फरक (भावांतर) तातडीने मिळावा, अस्मानी सुलतानीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या, आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाद्वारे परिसरातील हजारो शेतकऱ्यांची खरेदीमध्ये फसवणूक करण्यात आल्याच्या घटनांकडे लक्ष वेधण्यात आले.

हेही वाचा…वर्धा : आधीच वाघाची भीती, त्यात अस्वल उठले गावकऱ्यांच्या जीवावर; वृद्धाचा घेतला बळी

फसवणुकीवरून मोर्चात सहभागी शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र होते. मलकापूर शहरातील प्रमुख मार्गाने गगनभेदी घोषणा देत पावसात निघालेला मोर्चा प्रमुख मार्गावरून फिरून उपविभागीय (महसूल) कार्यलयावर येऊन धडकला. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यासंदर्भात बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की, मलकापूर परिसरात डॉ. प्रफुल्ल पाटील नामक व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. हा व्यापारी शेतकऱ्यांच्या मेहनतीचा सोयाबीन-कापूस पैसे न देता खरेदी करून फरार झाला आहे. या व्यापाऱ्याने जवळपास ९० कोटी पेक्षा रकमेचा शेतकऱ्यांना गंडा घातला आहे. या व्यापाऱ्यांची संपत्ती विकून शेतकऱ्यांची संपूर्ण वसूल करून द्यावी, अशी भूमिका रविकांत तुपकरांनी घेतली. यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे यावेळी दिसून आले.

हेही वाचा…एका कुटुंबाची दुर्दैवी कहाणी, वडील हृदयविकाराने गेले, आईचा अपघाती मृत्यू, आता मुलीची आत्महत्या…

तसेच शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या व्यापारी डॉ. पाटील यांच्या कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा रविकांत तुपकरांनी दिला. आता मी शांततेत आलो, पण पुढच्या वेळी असा येणार नाही, अशी तंबी त्यांनी दिली.

हेही वाचा…नागपुरात डेंग्यू, चिकनगुनियाचे थैमान…. ४ हजार ५५७ दूषित भांडी….

यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, तहसीलदार राहुल तायडे व मलकापूर शहरचे ठाणेदार गिरी यांच्या चर्चा करून निवेदन देण्यात आले. आक्रोश मोर्चात दामोदर शर्मा, अमोल राऊत, गजानन भोपळे, सचिन शिंगोटे, निलेश नारखेडे, रणजित डोसे, दत्ता पाटील, भागवत धोरण, विजय बोराडे, उमेश राजपूत, समाधान भातुरकर, राहुल मोरखेडे, विवेक पाटील,ललित डव्हले, अतुल पाटील, प्रवीण पाटील, अतुल नारखेडे, यांच्यासह कार्यकर्ते , पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मलकापूर पोलिसांनी मोर्चा निमित्त शहरात कडक पोलीस बंदोबस्त लावला होता.