बुलढाणा : मतदार यादी मोहिमेत जुळवणी न झालेल्या (नो मॅपिंग ) अथवा जुळवणीमध्ये तार्किक विसंगती आढळलेल्या आणि नोटीस मिळालेल्या मतदारांना भारत निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. या मतदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यासाठी संबंधित मतदारांनी आवश्यक कागदपत्रे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे (बीएलओकडे) सादर करावी असे निवडणूक विभागाने सूचित केले आहे.
काय आहे कार्यपद्धती?
नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांच्या घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पुन्हा भेटी देणार आहे. गृह भेटीत या मतदारांची आवश्यक कागदपत्रे जमा करतील. तसेच, मतदारांना ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातूनही आवश्यक कागदपत्रे अथवा पुरावे संबंधित बिएलओ कडे पाठविण्याची मुभा देण्यात आली आहे. निवडणूक विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
बिएलओंच्या अहवालावर होणार निर्णय
तार्किक विसंगती आढळलेल्या मतदारांच्या प्रकरणात संबंधित कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर अथवा बिएलओ यांच्या पडताळणी अहवालाच्या (पंचनामा) आधारे निर्णय घेण्यात येईल. विहित कागदपत्रे उपलब्ध नसल्यास केवळ अपवादात्मक परिस्थितीतच मतदार नोंदणी अधिकारी अथवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी शक्यतो ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेतील. अशा सुनावणीस संबंधित मतदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणतीही प्रौढ व्यक्ती उपस्थित राहू शकते. यामुळे अश्या मतदारांसाठी ही बाब पूरक दिलासा ठरणार आहे.
नोंदणीसाठी चारदा संधी
दरम्यान नोंदणीसाठी आयोगाने आणखी संधी उपलब्ध करुन दिली आहे मतदार नोंदणीसाठी ३ तारखेसह ४, १० आणि ११ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रावर विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहे. मॅपिंग न झालेल्या नोटीस प्राप्त मतदारांना या शिबिरात देखील आवश्यक कागदपत्रे सादर करता येणार आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील बेघर, कामगार, गरीब, आदिवासी तसेच अनाथ अशा असुरक्षित घटकांतील मतदारांसाठी विशेष शिबिरे व मदत कक्ष आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मतदारांना अधिकाधिक संधी
कोणताही पात्र मतदार मतदारयादीतून वंचित राहू नये, यासाठी सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मतदारांशी संपर्क साधणे तसेच आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी बिएलओ यांनी राजकीय पक्षांच्या बिएलओ सोबत समन्वय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पर्याप्त पुरावे उपलब्ध नसल्यास अंतिम निर्णय घेण्यापूर्वी संबंधित मतदाराला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची योग्य संधी देण्यात येणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.
