बुलढाणा: शेगाव परिसरातील जलंब रेल्वे स्थानक जवळील जीर्ण पाण्याची टाकी थेट रेल्वे रूळावर कोसळली तसेच विद्युत वाहक तारा क्षतिग्रस्त झाल्या. त्यामुळे खामगाव ते जलंब रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर उपाय योजना केल्याने सोमवारी संध्याकाळी उशिरा वाहतूक व परिस्थिती पूर्व पदावर आली. सोमवारी,२४ नोव्हेंबरला सायंकाळी उशिरा हा अभूतपूर्व घटनाक्रम घडला.
शेगाव तालुक्यातील जलंब येथून मुंबई ते नागपूर लोहमार्ग गेला आहे. रजतनगरी असलेल्या खामगावला जलंब येथून रेल्वे मार्ग जोडला आहे. तेथील मालधक्क्यावर मालगाडी जाते. तसेच जलंब ते खामगाव शटल रेल्वे सेवादेखील सुरू असते. जलंब येथील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या रेल्वे कर्मचारी वसाहतीला पाणीपुरवठा करणारी जुनी पाण्याची टाकी आहे (होती). ती मोडकळीस आल्याने व कालबाह्य झाल्याने ती पाडण्याचे काम एका ठेकेदाराकडे सोपविण्यात आले होते. टाकी पाडताना रेल्वे ट्रॅकवर पडणार नाही, याकरिता विरुद्ध बाजूला ताण लावण्यात आले होते. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे म्हणा वा दुर्दैवाने म्हणा त्या टाकीचा भार रेल्वे ट्रॅक (रुळा )कडे जास्त झुकल्यामुळे टाकी काही क्षणातच रेल्वे रुळावर कोसळली. टाकी कोसळताना विद्युत तार व देखील क्षतीग्रस्त झाले.
बुलढाणा: शेगाव परिसरातील जलंब रेल्वे स्थानक जवळील जीर्ण पाण्याची टाकी थेट रेल्वे रूळावर कोसळली तसेच विद्युत वाहक तारा क्षतिग्रस्त झाल्या. त्यामुळे खामगाव ते जलंब रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.https://t.co/2jrmCKw8Ui
— LoksattaLive (@LoksattaLive) November 25, 2025
(व्हिडीओ क्रेडिट – सोशल व्हायरल)#viralvideo… pic.twitter.com/pEmvBlVpm7
सुदैवाने टाकी ‘लुप लाईन’ वर कोसळली.
यामुळे रेल्वे ट्रॅकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले दरम्यान, खामगाव ते जलंब रेल्वे सेवा काही काळ विस्कळीत झाली . या अनपेक्षित घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले . खामगाव ते जलंब मार्गादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागला. त्यांना आपल्या गंतव्य स्थळी जाण्यासाठी अखेर अन्य मार्गाचा आधार घ्यावा लागला. सुदैवाने टाकी लुप लाईन (रुळावर ) पडल्याने आणि रेल्वे प्रवासी वाहतूक करणाऱ्या रुळावर न पडल्याने काल सोमवारी संध्याकाळी उशिरा परिस्थिती पूर्व पदावर आली. रेल्वे प्रशासनाचे आपत्कालीन यंत्रणा व नियोजन किती जलद व सक्षम असते हे या घटनेमुळे पुन्हा एकवार दिसून आले.
