यवतमाळ : आषाढी एकादशीनिमित्त वर्धा येथून पंढरपूर येथे वारकऱ्यांना घेवून जाणाऱ्या बसचा पुसद येथे माहूर फाट्याजवळ सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ही बस रस्ता दुभाजकावर धडकली. या अपघातात एका वृद्धेसह बालक गंभीर जखमी झाला. इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. बसमध्ये ४५ प्रवासी होते. सोमवारी दुपारी बस (क्र. एमएच १४, बीटी ४६७६) ही वर्धेहून वारकरी घेवून पंढरपूरकडे निघाली होती. बस रस्त्यात थांबली असताना बसचालक आणि वाहकाने मद्य प्राशन केल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

पुसद येथे येण्यापूर्वीही बस गतिरोधकाहून उसळली होती. तेव्हा चालकाला बस व्यवस्थित चालविण्याची विनंती केली, मात्र वाहकाने प्रवाशांना गप्प बसविले, असा आरोप प्रवाशांनी केला आहे. तीन महिन्यांपासून पगार झाला नाही, त्यामुळे सर्वांनी शंभर शंभर रूपये जमा करून द्या, अशी मागणीही वाहकाने केल्याचा आरोप एका महिला प्रवाशाने केला आहे.

हेही वाचा…नागपुरात अतिसार, विषमज्वराचा विळखा… पावसामुळे झाले असे की…

विद्यार्थ्यांनी पंचायत समितीत भरवली शाळा

शाळा सुरू झाल्यापासून उमरखेड तालुक्यातील उंचवडद येथील जिल्हा परिषद शाळेवर एकही शिक्षक नाही. शाळा शन्य शिक्षकी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेत शिक्षक मिळावे या मागणीसाठी गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत उंचवड जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पंचायत समितीत नेऊन गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षातच शाळा भरवली. लुक्यातील उंचवडद, बोरगाव, बोरगाव तांडा ,परोटी, भोजु नगर २, भांबरखेडा व सोईट घडोळीया बंदी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पुरेशी संख्या असतानासुद्धा शिक्षक नाही. उमरखेड तालुक्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी असुनही त्या एक शिक्षकी आहे. शाळांमध्ये शिक्षकांची पुरेशी संख्या द्या म्हणून पालकांची मागणी आहे.

हेही वाचा…नागपूर विद्यापीठ पुन्हा चर्चेत, माजी विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यावर कोट्यवधीची उधळपट्टी होणार ?

मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून ज्या शाळांमध्ये शिक्षक आहेत, त्यांनाही इतरत्र पाठविले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंचवडद येथे मार्च २०२४ मध्ये पवित्र पोर्टलद्वारे दोन शिक्षकांची नियुक्ती झाली होती. मात्र त्यांच्या नियुक्ती आदेशात अंशत: बदल करून या महिला शिक्षकांना इतरत्र नियुक्ती देण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. उंचवडद येथील जिल्हा परिषद शाळा उपक्रमशील शाळा म्हणून लौकीकप्राप्त असतानाही या शाळेला शुन्य शिक्षकी शाळा केल्याने संताप अनावर झालेल्या ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसह थेट पंचायत समिती गाठून तेथे शाळा भरविल्याने शिक्षण विभागातील गोंधळ चव्हाट्यावर आला. या शाळेला शिक्षक दिले जात नाही तोपर्यंत विद्यार्थी उठणार नाही, असा इशारा देत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय कदम, उपाध्यक्ष श्यामसुंदर शिरफुले, प्रहारचे तालुका प्रमुख राहुल मोहितवार, जनशक्ती पक्षाचे बंडू हमंद यांच्यासह पालकांनी विद्यार्थ्यांसह गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड यांचा दालनात ठिय्या दिला. प्रशासनाने या आंदोलनाची तत्काळ दखल घेत, उंचवडद येथील शाळेवर दोन शिक्षकांची नियुक्ती करण्याची ग्वाही दिली.