नागपूर : ‘सीएनजी’ इंधनाच्या तुटवडय़ामुळे महापालिकेच्या ‘आपली बस’ ताफ्यातील ७० बसेस सध्या बंद आहेत. यामुळे आधीच तोटय़ात असलेल्या महापालिकेला आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून प्रवाशांनाही याचा फटका बसत आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनंतर महापलिकेने २०१९ मध्ये आपली बसच्या ताफ्यातील काही डिझेल बसेस सीएनजी इंधनावर परिवर्तीत केल्या. रॉमॅट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून या बसगाडय़ांसाठी सीएनजी इंधनाचा पुरवठा केला जात होता. तो गेल्या मार्च महिन्यापासून बंद आहे. याचबरोबर इंधनाच्या दरातही वाढ झाली आहे. मंगळवारी ११७ रुपये प्रतिकिलो सीएनजीचे दर होते. रॉमॅटने सर्वप्रथम शहरातील तीन बस संचालकांपैकी ‘ट्रॅव्हल टाईम’ या संचालक कंपनीचा सीएनजी पुरवठा बंद केला. त्यानंतर ७ एप्रिल रोजी हंसा सिटी बस आणि ८ एप्रिलला आर. के. सिटीचा पुरवठा बंद करण्यात आला. यामुळे महापालिकेला ७० सीएनजी बसेस बंद कराव्या लागल्या, अशी माहिती महापालिकेच्या परिवहन अधिकाऱ्यांनी दिली.

करारानुसार, या सर्व बसगाडय़ांमध्ये ‘सीएनजी किट’ लावण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा भार उचलण्याचे रॉमॅटने मान्य केले होते. यासाठी प्रतिबस ३.२५ लाख रुपयांचा खर्च होता. बस संचालकांना पुरवल्या जाणाऱ्या सीएनजी इंधनासाठी प्रतिकिलोमागे पाच रुपये अधिक या दराने रॉमॅट कंपनी हा खर्च वसूल करणार होती. करारावेळी सीएनजीचा दर प्रतिकिलो ६० रुपये होता. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात एलएनजी इंधनाच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम सीएनजीवरही झाला. त्यामुळे शहरात सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला. रॉमॅटने बसगाडय़ांचा सीएनजी पुरवठा बंद केल्यानंतर महापालिकेने अनेकदा नोटीस बजावून पाठपुरावा केला. मात्र, यावर अजूनही काही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आपली बसच्या ताफ्यातील ७० बसेस बंद आहेत.

‘आपली बस’ची तपासणी

गेल्या दीड-दोन महिन्यात महापालिकेच्या तीन बसगाडय़ांना आग लागली. याची दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी बुधवारी खापरी, वाडी, हिंगणा आणि कोराडी येथील आपली बस डेपोला भेट देऊन तीनशे बसेसची तपासणी केली. या बसचा अहवाल उद्या, शुक्रवारी आयुक्तांना सोपवला जाणार आहे.