अविष्कार देशमुख

सुबक, नक्षीदार आकारात वऱ्हाडय़ांना लग्नाचा मुहूर्त कळवणाऱ्या लग्नपत्रिकांचाच ‘मुहूर्त’ यंदा बिघडला असून टाळेबंदीमुळे राज्यात तब्बल दोनशे कोटींचा व्यवसाय ठप्प पडला आहे.

७ नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधानांनी नोटबंदी जाहीर केली. त्यामुळे राज्यातील लग्नपत्रिका व्यवसायाला शंभर कोटींचे नुकसान सहन करावे लागले. ही तूट भरून काढण्यास त्यांना दोन वर्षांचा अवधी लागला. मात्र आता गाडी रुळावर येत असतानाच करोनाच्या संकटामुळे लागलेल्या टाळेबंदीने त्यांचे कंबरडेच मोडले. ऐन हंगामातील प्रमुख तीन महिने व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आल्याने आर्थिक घडी न भुतो न भविष्यती अशी विस्कळीत झाली आहे. लग्न समारंभाचे सर्वाधिक शुभ मुहूर्त उन्हाळ्यात येतात. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यंदा २० टक्क्यांनी अधिक व्यवसायाचे लक्ष्य ठेवून राज्यातील व्यावसायिकांनी यंदाच्या हंगामासाठी दोनशे कोटींचा कच्चा माल खरेदी केला. अनेकांनी त्यासाठी बँकेतून कर्ज घेतले. हा सर्व कच्चा माल जानेवारीत राज्यातील विविध जिल्ह्यंत पोहोचला. अनेकांनी लग्नपत्रिका निवडल्या, मजकूरही दिला. पत्रिकाही छापून झाल्या. मात्र ऐन मार्च महिन्यात करोनाच्या या संकटामुळे राज्यात आधी संचारबंदीं आणि नंतर टाळेबंदी लागू झाली. या टाळेबंदीत शुभ मुहूर्त निघून गेल्याने आता ग्राहक लग्नपत्रिका घेण्यास नकार देत असून उर्वरित रक्कमही परत करायला तयार नाहीत.  बँकेचे हप्ते भरण्यास  सवलत असली तरी ते व्याजासह  देणे आहेच. मुंबई वेडिंग कार्ड असोसिएशनचे सदस्य जश जैन यांच्या मते, लग्नसोहळ्याला केवळ पन्नास जणांच्या उपस्थितीला परवानगी दिल्याने कुणीच पत्रिका छापत नाही. या व्यवसायाशी निगडित डीटीपी ऑपरेटर, डिझायनर, रंग- सजावटसह हॅण्डमेड पत्रिका तयार करणारे अशा लाखो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

टाळेबंदीमुळे लग्नसोहळ्याचा मुख्य हंगाम हातचा गेल्याने राज्यातील लग्नपत्रिका व्यवसायाला दोनशे कोटींचे नुकसान झाले आहे. आता नोव्हेंबरमधील शुभ मुहूर्ताची प्रतीक्षा आहे.

– प्रकाश सोळंकी, अध्यक्ष, मुंबई वेडिंग कार्ड असोसिएशन.