दरवर्षी राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये विधीमंडळाचे एक अधिवेशन आयोजित केले जाते. मात्र, करोना संसर्गानंतर राज्यातील ठाकरे सरकारने नागपूर अधिवेशन रद्द करून मुंबईतच अधिवेशन घेतलं. याला विरोधी पक्ष भाजपाने जोरदार विरोधही केला. मात्र, आता नागपूरमधील व्यापारी देखील नागपूरला अधिवेशन न झाल्याने होणाऱ्या नुकसानीविषयी नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. नागपूरला अधिवेशन न झाल्याने जिल्ह्याचा ३०० कोटी रुपयांचा तोटा झाल्याचं या व्यापाऱ्यांनी सांगितलं. सरकारने नागपूरचं अधिवेशन याविषयी सीएडीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले, "नागपुरात दरवर्षी अधिवेशन घेण्यात यावा असा नागपुर करार केला गेला होता. परंतु मागील कोरोनामुळे अधिवेशन घेण्यात आले नाही. त्यामुळे व्यापाराला खूप मोठं नुकसान झालं. म्हणून या वर्षी सर्व व्यापाऱ्यांची आशा अधिवेशनाकडे लागली होती. नागपुरात अधिवेशन झालं तर व्यापाराला चालना भेटली असती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने यावर्षी देखील नागपूर अधिवेशनाकडे पाठ फिरवली. यामुळे नागपूरच्या व्यापाऱ्यांना जवळजवळ ३०० कोटी रुपयांचा तोटा झाला." "अधिवेशन न झाल्यास आमच्या व्यवसायाला किमान ३०० कोटी रुपयांचं नुकसान" नागपूर हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजेंद्रसिंग रेणू म्हणाले, "इतर व्यवसायांप्रमाणेच हॉटेल व्यवसाय देखील मागील २ वर्षांपासून कोलमडला आहे. कोविडचा आमच्यावर जास्त परिणाम झाला, कारण लोकांनी या काळात प्रवासच केला नाही. मागील वर्षी देखील राज्याचं अधिवेशन नागपूरमध्ये झालं नव्हतं. त्यामुळे यंदा आम्ही खूप आशा लावून बसलो होतो. २-३ आठवड्याचं अधिवेशन होईल. त्यामुळे खूप सारे लोक येतात आणि खूप व्यापारही होतो. जिल्ह्यासह राज्याभरातून लोक येतात त्यामुळे व्यवसायाला फायदा होता. यंदा अधिवेशन न झाल्यास आमच्या व्यवसायाला किमान ३०० कोटी रुपयांचं नुकसान होईल." हेही वाचा : सलग दुसऱ्या वर्षी हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय "नागपुरात अधिवेशनाची तयारी जशी सरकार करते त्याच बरोबर नागपुरातील व्यापारी देखील अधिवेशनची तयारी करतात. यासाठी व्यापारी १ महिन्यापासून तयारी सुरू करतात. कारण अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक ठिकाणावरून लोक नागपुरात येतात. यामुळे नागपुरातील हॉटेल आणि लॉज भरलेले असतात," अशी माहिती तेजेंद्रसिंग रेणू यांनी दिली. सलग दुसऱ्या वर्षी हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार नागपूरला होणारं यंदाचं राज्य हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानं हे अधिवेशन मुंबईत घेतलं जाणार आहे. हा निर्णय घेण्यामागे करोनाचं सावट आणि विधान परिषद निवडणूक हेही कारणं असल्याचं बोललं जातंय. जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन संपतानाच हिवाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली होती. यानुसार ७ डिसेंबर २०२१ रोजी नागपूर येथे विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन होईल असं ठरलं. मात्र, या अधिवेशनाला काही दिवस शिल्लक असताना देखील नागपूरमध्ये तयारीसाठी हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून यंदाचं हिवाळी अधिवेशन देखील नागपूर ऐवजी मुंबईलाच होईल असा तर्क लावला जात होता. अखेर हा अंदाज खरा ठरला. विदर्भाबाहेर हिवाळी अधिवेशन होण्याची सहावी वेळ विशेष म्हणजे राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचं निश्चित असलं तरी काही कारणाने हे अधिवेशन नागपूरला न घेता विदर्भाबाहेर होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. ही जवळपास सहावी वेळ आहे जेव्हा नागपूरचं हिवाळी अधिवेशन नागपूरला न होता इतरत्र घेण्यात आलं.