नागपूर : लहानपणी “लांडगा आला रे आला” ही गोष्ट सर्वांनीच ऐकली, पण आता लांडगा नाही, तर वाघ शहराच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे नागपूरकरांची झोप मात्र नक्कीच उडाली आहे. शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर वाघाचा मुक्त संचार आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बुधवारी सायंकाळच्या सुमारास बुटीबोरी परिसरात एका उद्योजकाला वाघ दिसला. त्यानंतर वनविभागाची चमू घटनास्थळी पोहोचली. वाघ जंगलात परतला असला तरीही वनविभागाची चमू मात्र या परिसरात आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास अदानी वीज निर्मिती प्रकल्पापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर बुटीबोरी भाग दोन परिसरात एका उद्योजकाला व्याघ्रदर्शन झाले. ही माहिती बुटीबोरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाला कळवण्यात आली. तातडीने या कार्यालयाची चमू घटनास्थळी पोहोचली. वाघ जंगलाच्या दिशेने निघून गेला असला तरीही परिसरातील नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.

सरपंच तसेच गावातील सर्व नागरिक वनखात्याच्या चमूला सहकार्य करत आहे. बोर व्याघ्रप्रकल्प ते उमरेड-पवनी-कऱ्हांडला अस हा जुना कॉरिडॉर आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षात या परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योग येऊ लागले. त्यामुळे वाघांची ही मार्गिका खंडित झाली. या परिसरात यापूर्वी देखील वाघ दिसल्याच्या घटना केवळ चर्चेत होत्या. गुरुवारी या परिसरात आलेल्या वाघाला कॅमेऱ्यात टिपण्यात यश आले आहे. आम्ही परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत, असे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे यांनी सांगितले.

हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर शहरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. तर आता वाघाचे सावट या शहराच्या वेशीवर येऊन ठेपले आहे. बुधवारी शहरात ज्या परिसरात वाघ आला तो वाघांचा खूप जुना बोर व्याघ्रप्रकल्प ते उमरेड-पवनी-कऱ्हांडला असा कॉरिडॉर आहे. बुटीबोरी हा आता इंडस्ट्रीयल एरिया झाल्यानंतर बुटीबोरी दोन असा नव्याने हा विस्तार होत आहे आणि नेमका तो वाघांच्या अधिवासात आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योगांची उभारणी झाल्यामुळे वाघांचा हा कॉरिडॉर खंडित झाला आहे.

बुधवारी ज्या ठिकाणी एक उद्योजकाला व्याघ्रदर्शन झाले, ते ठिकाण अदानी पॉवर प्लांटपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. तर नागपूर शहरापासून अवघ्या २५ ते ३० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. यापूर्वी देखील याठिकाणी वाघ आला आहे, मात्र त्याचा पुरावा मिळालेला नव्हता. बुधवारी एक उद्योजकाला त्याचा व्हिडिओ घेण्यात यश आले.