वर्धा : फुलपाखरांची दुनियाच न्यारी. पंखांवर रंगांची उधळण. मोहक, भिरभिर करीत फिरणाऱ्या या पाखरांचा सर्वांना लळा. मानवी जीवनात फुलपाखरास मानाचे स्थान. कविता, चित्रकला, चित्रपट व अन्य कलेत हे पाखरू डोकावते. २०१५ साली राज्य फुलपाखरू म्हणून Blue Mormon या निळ्या रंगाच्या फुलपाखराची निवड करण्यात आली.
वनस्पती व प्राणीसृष्टीचे प्रतीनिधीत्व करणाऱ्या प्रतिकापैकी एक म्हणून ही निवड, असे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही निवड जाहीर केली होती. महाराष्ट्रात २२५ प्रकारची फुलपाखरू असून देशातील १५ टक्के प्रमाण महाराष्ट्रात आहे. खास Butterfly Garden तयार झाले आहे.
फुलपाखरू आणि पतंग
बाग बगीच्यात फुलपाखरू आहेत तसेच अन्य एक कीटक पण तेवढाच महत्वाचा आहे. त्यास पतंग ( Moth ) असे म्हणतात. पण फुलपाखरासारखे त्यास स्थान मिळालेले नाही. तुलनेत त्यावर अन्याय झाल्याची भावना निसर्गप्रेमी व्यक्त करतात. एक कुरूप, अपायकारक असा पतंगबाबत गैरसमज पसरला आहे. हा छोटा पण तेवढाच महत्वाचा कीटक असल्याचे प्राणीशास्त्रज्ञ म्हणतात. परागीकरणात त्याचेही महत्व तेवढेच.
दोघात फरक
फुलपाखरू व पतंग हे दिसायला सारखेच. पण रंगाची उधळण फुलपाखरावर. पतंग हे राखाडी किंवा मळकट रंगाचे असतात. मोठा फरक हा त्यांच्या स्पर्शशृंगात ( Antennae ) हा आहे. फुलपाखरांचे शृंग लांब व टोकास गदेप्रमाणे असतात. शरीर एकाचे बारीक तर पतंगाचे जाडसर असते. पतंगास पंखाची जोडी असते, असे वन्यजीव अभ्यासक संजय इंगळे तिगावकर हे सांगतात. पतंग निशाचर म्हणजे रात्रीस वावरणारे तर फुलपाखरू हे दिवसा भ्रमंतीवर. रात्री दिव्यांभोवती घिरट्या घालतात ते पतंगच असतात.
अतिशय संवेदनशील
पतंगाचे स्पर्श शृंग हे अनेकदा पिसासारखे दिसतात. ते वास ओळखण्यासाठी अतिशय संवेदनशील समजल्या जातात. त्यांचे कार्य हे वासाचा अंदाज घेण्यासाठी व समतोल राखण्यासाठी होतो. पतंग या कीटकाच्या पण विविध जाती आहेत. त्याचे दस्तावेजीकरण करण्याचा प्रयत्न सूरू आहे. जगात पतंगाच्या अडीच हजारावर जाती असल्याचे सांगण्यात येते.
परागीकरण करतात
पतंग हे अन्न साखळीत महत्वाचे. परागसिंचन करण्यात पुढे. फुलातील परागकण एका फुलातून दुसऱ्या फुलात नेण्याचे महत्वाचे कार्य ते करतात. त्यामुळेच वनस्पतीचे पूनरुत्पादन होते. ते विश्रांती पण घेतात. ती घेतांना पतंग आपले पंख सपाट किंवा छतासारखे पसरवून ठेवतात. तर फुलपाखरू हे आपले पंख एकत्रित उभ्या स्थितीत मिटतात. रेशीम किडा हा एक प्रकारच्या पतंगचीच अळी असते.
पतंग संशोधन
जैविक विविधते विपुल अशी बोर अभयारण्याची ओळख दिल्या जाते. ईथे पतंग व फुलपाखरू मोठ्या संख्येत आढळतात. इथेच दिवसा पण भिरभिरणारे पतंग दिसून येतात, अशी माहिती Bor Tiger Reserve च्या वन अधिकारी अर्चना नौकरकर सांगतात. त्या खास पतंग या विषयावर शोधप्रबंध लिहत आहे. त्यासाठी त्या विविध पतंगांचा धांडोळा घेत आहेत. विविध पतंग त्यांनी कॅमेराबद्ध केलेत. यांची दुनियाच वेगळी, असे त्या म्हणतात. दुर्लक्षित असा हा एक कीटक आहे. फुलपाखरास राज्य दर्जा, फुलपाखरू बाग, फुलपाखरू अभ्यास असे महत्व पतंगास मात्र नाही. मात्र पर्यावरण आरोग्य निर्देशांकात फुलपाखरू व पतंग महत्व राखून आहेत. ज्या परिसरात हे दोन्ही मोठ्या प्रमाणात आढळून येतात तो परिसर पर्यावरणदृष्टया सुदृढ ठरतो.
