नागपूर : उत्तर बंगालमधील बक्सा व्याघ्रप्रकल्पातून जंगलात सोडण्यात आलेली एक वाघीण पश्चिम बंगालची सीमा ओलांडून आसाममधील रायमोना राष्ट्रीय उद्यानाजवळ पोहोचली. मात्र, तिच्या गळ्यात बसविण्यात आलेल्या जीपीएस रेडिओ कॉलरचे सिग्नल अचानक बंद झाल्याने गेल्या अनेक तासांहून अधिक काळ तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. वाघिणीचा माग काढण्यासाठी पश्चिम बंगाल आणि आसामच्या वनविभागाने संयुक्त शोधमोहीम सुरू केली असून, सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) जवानांचीही मदत घेण्यात येत आहे. परिसरात ड्रोनच्या माध्यमातून शोध घेतला जात आहे.

पहाटे दीडच्या सुमारास संपर्क तुटला

गुरुवारी पहाटे एक ते दीडच्या सुमारास वाघिणीच्या जीपीएस कॉलरकडून सिग्नल मिळणे बंद झाले. त्यापूर्वी तिचे शेवटचे लोकेशन आसाममधील हातिगड गावाजवळ नोंदविण्यात आले होते. हे ठिकाण रायमोना राष्ट्रीय उद्यानापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. राजेंद्रपूर गावातून सुमारे १२ ते १५ किलोमीटर अंतर पार करून वाघीण या परिसरात पोहोचली होती. विशेष म्हणजे, तिचे शेवटचे लोकेशन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३१ च्या परिसरात नोंदविण्यात आले. त्यामुळे वाघीण मानवी वस्तीजवळ किंवा महामार्गाच्या आसपास असण्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागाने शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे.

दाट जंगल, गुहा किंवा खडकाळ भागामुळे सिग्नल बंद?

वाघिणीच्या कॉलरचे सिग्नल मिळत नसले, तरी ती बेपत्ता झाली किंवा तिच्यासोबत काही अनुचित घटना घडली, असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दाट जंगलातील वृक्षराजी, खडकाळ भूभाग आणि सिग्नल प्रसारणातील अडथळे यामुळे जीपीएस कॉलरचे सिग्नल तात्पुरते खंडित होऊ शकतात. वाघिणीने एखाद्या प्राण्याची शिकार करून त्याला दाट झाडीत किंवा गुहेत नेले असल्यासही कॉलरचे सिग्नल मिळण्यात अडचण येऊ शकते. वाघिणीने शिकार केल्यानंतर ती दाट वनस्पती किंवा गुहेत गेली असण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी कॉलरचे सिग्नल प्रसारित होऊ शकत नाहीत.

दोन पाळीव डुकरांच्या पिल्लांची शिकार

या वाघिणीने दोन रात्रींपूर्वी परिसरातील दोन पाळीव डुकरांच्या पिल्लांची शिकार केल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे ती मानवी वस्तीजवळील अधिवासात वावरत असल्याचे स्पष्ट होते. तिचे शेवटचे लोकेशनही गाव आणि राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ असल्याने स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाघिणीचा शोध घेताना तिची हालचाल कोणत्या दिशेने झाली, ती जंगलाच्या आत गेली की मानवी वस्तीजवळच आहे, याचा माग घेण्याचे काम सुरू आहे. संभाव्य मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे हे या शोधमोहिमेतील वनविभागाचे प्रमुख प्राधान्य आहे.

वन्यजीव शिकारीच्या घटनांमुळे चिंता

वाघिणीशी संपर्क तुटल्याने या सीमावर्ती जंगल परिसरातील वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. रायमोना राष्ट्रीय उद्यान आणि त्यालगतच्या वनक्षेत्रात यापूर्वी वन्यजीव शिकारीच्या गंभीर घटना घडल्या आहेत. सप्टेंबर २०२६ मध्ये रायमोना राष्ट्रीय उद्यानात एका हत्तीची सोंड शिकारीच्या फासात अडकून तो गंभीर जखमी झाला होता. त्याआधी याच वर्षी आसाममधील चिरांग जिल्ह्यातील कराईबारी वनक्षेत्रात एका हत्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्याचे सुळे काढून नेण्यात आले होते.