नागपूर : कर रचनेत काम करतांना अधिकाऱ्यांपुढे बरेच प्रकरणे गुंतागुंतीचे येतात. यात काय निर्णय घ्यावा? त्याबाबत पेच निर्माण होते. अशा वेळी काय करावे, याबाबत भारताचे महालेखापरीक्षक आणि नियंत्रक (कॅग) के. संजय मूर्ती यांनी नागपूर येथे काही सूचना केल्या.
नागपुरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडिटी) येथे भारतीय महसूल सेवेच्या (आयआरएस) ७९ व्या तुकडीच्या उद्घाटन समारंभाला मुख्य अतिथी म्हणून संबोधित करत होते. यावेळी मंचावर नागपूरच्या प्रधान आयकर आयुक्त मालती श्रीधरण, एनएडीटीचे महासंचालक एस. के मॅथ्यूज उपस्थित होते. के. संजय मूर्ती म्हणाले, कर अधिकाऱ्यांनी गुंतागुंतीच्या कर प्रकरणात विवेकबुद्धी आणि कार्यतत्परतेने सामोरे जावे आणि देश हितासाठी आर्थिक विकासात योगदान देण्याकरिता आपल्या अनुभवाचा वापर करावा.
देशातील आर्थिक विकासाला तसेच प्रगतीला चालना देणाऱ्या सेवांपैकी भारतीय राजस्व सेवा ही महत्त्वाची असून या सेवेतील अधिकाऱ्यांनी कर प्रशासनातील गुंतागुंत समजून घेण्याकरिता इतरही विभागांच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करायला हवा. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीला क्षमता निर्माण आयोग सीबीसी द्वारे नुकतेच मिळालेले पंचतारांकित नामांकन हे इतर शासकीय प्रशिक्षण संस्थाकरिता आदर्शवत ठरेल असेही मूर्ती यांनी सांगितले.
आय. आर. एस. अधिकाऱ्यांनी त्यांच्या ज्ञान कक्षा रुंदवण्याकरिता तसेच एक परीक्षक म्हणून लेखापरीक्षण विभागाच्या कार्यप्रणालीचा देखील अभ्यास करून करप्रशासनात आवश्यक असणाऱ्या परीक्षण आणि लेखा या कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असा सल्लादेखील के. मूर्ती यांनी दिला.
राॅयल भूतान सर्विसमधीलही दोन अधिकारी
७९ व्या आयआरएस अधिकाऱ्यांच्या तुकडीचा प्रशिक्षण अहवाल मांडताना या अभ्यासक्रमाचे संचालक सलील बिजूर यांनी म्हणाले, या तुकडीमध्ये एकूण १८२ अधिकारी असून यात २ रॉयल भूतान सर्विस मधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सर्वात तरुण अधिकाऱ्यांचे वय २३ वर्षे असून या बॅचमध्ये ६७ टक्के महिला प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत तर ४९ टक्के अधिकाऱ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी ही अभियांत्रिकीची आहे. ४७ प्रशिक्षणार्थी अधिकारी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तर २ अधिकारी हे पीएचडी पीएचडी प्राप्त केलेले आहेत.
सर्वात जास्त अधिकारी उत्तर प्रदेश मधून असून त्यानंतर राजस्थान महाराष्ट्र आणि केरळ तसेच इतर राज्यातील आहेत. याप्रसंगी १८२ प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना कर प्रशासनाची शपथ अकादमीचे अतिरिक्त महासंचालक सिधरामआप्पा कपट्टनवार यांनी दिली. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीतील अधिकारी, ७८ व्या तुकडीतील अधिकारी, आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते .
