संधी हुकलेल्या उमेदवारांची आरोग्य विभागाकडून फेरपरीक्षा

सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पदभरतीमध्ये झालेल्या अक्षम्य चुकांचे खापर मे. न्यास कम्युनिकेशन या खासगी कंपनीवर फोडून राज्य सरकारने हात वर केले असले तरी या परीक्षांमधील चुकांची मालिका सुरूच आहे.

देवेश गोंडाणे

नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पदभरतीमध्ये झालेल्या अक्षम्य चुकांचे खापर मे. न्यास कम्युनिकेशन या खासगी कंपनीवर फोडून राज्य सरकारने हात वर केले असले तरी या परीक्षांमधील चुकांची मालिका सुरूच आहे.

भंडारा जिल्ह्य़ाच्या तुमसर येथील शारदा विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील गट ‘ड’च्या १३० उमेदवारांचे बैठक क्रमांक आणि पेपरही या केंद्रावर पाठवण्यात न आल्याने त्यांची परीक्षाच न झाल्याची नवीन बाब समोर आली आहे.

आरोग्य विभागाने परीक्षेपासून वंचित राहिलेल्या अशा उमेदवारांची फेरपरीक्षा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात घेण्याचे जाहीर केले असले तरी यामध्ये अशा शेकडो उमेदवारांचा समावेश नसल्याचे हे १३० उमेदवार ढिसाळ नियोजनाचे बळी ठरण्याची शक्यता आहे.  

राज्यभर गोंधळ उडवणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २४ आणि ३१ ऑक्टोबरला झालेल्या लेखी परीक्षेदरम्यान न्यास कम्युनिकेशन प्रा.लि.(एनसीपीएल) या खासगी कंपनीने परीक्षेदरम्यान अक्षम्य चुका केल्याचा ठपका आरोग्य सेवा आयुक्तालयाने ठेवला आहे. परीक्षेत गैरव्यवस्थापन, नियोजनाचा अभाव, परीक्षा केंद्रांमधील वास्तवाची कल्पना नसणे आणि समन्वयाच्या अभावामुळेच परीक्षेत गोंधळ निर्माण झाल्याने कंपनीवर दंडात्मक कारवाई का करू नये, अशी ताकीद देण्यात आली होती.

यावर न्यास कंपनीला उत्तरही मागवण्यात आले होते. केंद्रांवर चुका झाल्याचे न्याय कंपनीने मान्य केले असून परीक्षेपासून वंचित असणाऱ्या उमेदवारांची फेरपरीक्षा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात घेतली जाणार आहे.

मात्र, नियोजनातील चुकांमुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या तुमसर येथील १३० उमेदवारांचा फेरपरीक्षांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या उमेदवारांनाही परीक्षेची संधी देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

घडले काय?

तुमसर येथील शारदा विद्यालयातील परीक्षा केंद्रावर १३० उमेदवारांची परीक्षा होणार होती. दुपारी २ ते ४ वाजता गट ड संवर्गातील पदांची परीक्षा देण्यास हे उमेदवार गेले असता येथे तुमचे परीक्षा केंद्रच नाही असे सांगण्यात आले. या उमेदवारांसाठी आवश्यक प्रश्नपत्रिकाही येथे पुरवण्यात आलेल्या नव्हत्या. विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्यानंतरही त्यांना न्याय मिळाला नाही. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागाकडे तक्रार केली असून त्यांची फेरपरीक्षा घ्यावी अशी मागणी होत आहे.

आरोग्य विभाग आणि परीक्षा घेणाऱ्या कंपनीनेही परीक्षेदरम्यान चुका झाल्याचे मान्य केले आहे. नैसर्गिक न्यायानुसार ही परीक्षाच ग्राह्य़ धरता येणार नाही. त्यामुळे फेरपरीक्षा घेणे हा आपल्या चुका लपवण्याचा नवा प्रकार आहे. आरोग्य विभागाची परीक्षाच रद्द करण्यात यावी व अशा शेकडो उमेदवारांना न्याय द्यावा.

नीलेश गायकवाड, सचिव, एमपीएससी समन्वय समिती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Candidates missed opportunity health ysh

Next Story
नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदासाठी गडकरी-फडणवीस समर्थकांमध्ये चढाओढ
ताज्या बातम्या