अकोला : सहवैमानिकानेच घडवून आणलेला भीषण अपघात प्रसंगावधान आणि अफाट शौर्याच्या जोरावर उधळून लावणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांचे अकोल्याशी खास नाते आहे. त्यांचे आजोळ अकोला असून अनेक कौटुंबिक समारंभात त्यांनी हजेरी लावली आहे. भाच्याने दाखवलेले अभूतभूर्व धाडस आणि वाचवलेले १८० प्रवाशांचे प्राण अकोलेकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

संकटसमयी दाखवले अचाट धैर्य

कॅप्टन स्मित मच्छार यांनी संकटसमयी दाखवलेल्या अचाट धैर्याचे आणि कौशल्यामुळे मोठा अपघात टळला. अत्यंत कठीण परिस्थितीत शेकडो जीवांचे रक्षण करणाऱ्या त्यांच्या या शौर्याचे भारतातच नव्हे, तर जगभरातून कौतुक केले जात आहे. विमानाच्या आपत्कालीन प्रसंगात दाखवलेल्या प्रसंगावधानात कॅप्टन स्मित मच्छार जखमी झाले होते. घटनेनंतर लगेचच सौदी अरेबियातील तबूक येथील रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यांच्यावर पुढील उपचारांसाठी अबुधाबी येथे हलविण्यात आले. २ ऑक्टोबर रोजी रुग्णालयातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम विषद केला.

मूळ मुंबईकर, आईचे माहेर अकोल्याचे

स्मित मच्छर हे मूळचे मुंबईचे आहेत. त्यांचे आई-वडील गीताबेन आणि उपेंद्रकुमार मच्छर हे घाटकोपर येथे राहतात. गीताबेन यांचे माहेर अकोल्यातील रामदासपेठ परिसरात आहे. रेल्वेस्थानक मार्गावर राहणारे लक्ष्मीदास वीरचंद जोगी हे स्मित यांचे आजोबा. कुटुंबातील सुखदुःखाच्या प्रसंगी स्मित अनेकदा आईसोबत अकोल्यात येऊन गेले आहेत. त्यांचे मामा राजेंद्र जोगी, दीपक जोगी आणि भरत जोगी आजही रामदासपेठ परिसरात राहतात. गीताबेन या स्त्री रुग्णालयाच्या माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राधा जोगी यांच्या नणंद आहेत. गीताबेन आणि उपेंद्रकुमार मच्छर यांचा स्मित हा एकुलता एक मुलगा आहे. स्मित यांच्या शौर्याची गाथा समोर आल्यानंतर त्यांच्या अकोल्यातील नातेवाइकांसाठीही हा प्रसंग अभिमानाचा ठरला आहे.

अकोल्यात अभिमान व गौरवाचा क्षण

दुबईत कार्यरत असलेले स्मित यांचे रामदासपेठेतील जोगी कुटुंबाशी असलेले त्यांचे नाते, आईचे अकोला हे माहेर आणि बालपणापासून सुख दुःखाच्या प्रसंगी अकोल्यात आले आहेत. त्यामुळे स्मित यांचे अकोला शहराशी भावनिक नाते आहे. विमानातील संकटाच्या वेळी त्यांनी दाखविलेल्या धैर्यामुळे आजोळच्या शहरातही त्यांच्या कार्याची चर्चा होत असून आनंद आणि अभिमान व्यक्त केला जात आहे.