नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) परिसरात चार निवासी डॉक्टरांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली. या विभागाने  सोमवारी दिवसभर श्वान पकडण्याची मोहीम राबवली.  पकडण्यात आलेल्या सात पैकी एका श्वानात रेबीजचे प्राथमिक लक्षणे आढळून आल्याने अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान मेडिकल परिसरात मोकाट श्वानांची संख्या अधिक असल्याने अधिकारी- कर्मचाऱ्यांत दहशत कायम आहे.

 आठवड्याभरात ४ निवासी डॉक्टरांना श्वानांनी चावा घेतला होता. त्यातील एक महिला डॉक्टर गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मेडिकल प्रशासनाने गेल्या आठवड्यात वारंवार महापालिकेला पत्र लिहून भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर श्वानांनी दोन डॉक्टरांना चावा घेतला. त्यामुळे महापालिकेच्या कोंडवाडा विभागाचे पथक सकाळीच मेडिकल परिसरात दाखल झाले. पहिल्या टप्प्यात सात श्वान पथकाच्या हाती लागले. त्यापैकी एक आजारी होता. त्यात रॅबीज सदृश्य लक्षणे आढळली. रात्री उशिरापर्यंत कुत्र्यांचा शोध सुरू होता. परिसरात पन्नास ते साठ मोकाट श्वान आहेत. त्यांना पकडेपर्यंत भीती कायम आहे, असे मार्डचे अध्यक्ष डॉ. संजय बंसल यांनी सांगितले.