लोकसत्ता टीम
यवतमाळ : खरिप हंगामात जिल्ह्यात गुजरातमधील बोगस कृषी उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचा प्रकार कृषी विभागाच्या कारवाईतून उघड झाला आहे. सततच्या नापिकीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दर्जाहीन बोगस खते विकली जात आहे. यासाठी गुजरातच्या कंपनीने थेट पुण्यात शाखा उघडली. या बोगस खत कंपनीचा भांडाफोड झाल्यानंतर कंपनीच्या संचालकासह खत विक्रेत्या जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकाविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुजरातमधील रामा फर्टिकेम लि. या कंपनीने १०:२६:२६, डीएपी हे खत निकृष्ट दर्जाचे असल्याचे कृषी विभागाने केलेल्या तपासणीत आढळून आले. या खताचे नमुने प्रयोगशाळेत सदोष निघाले. या खतात आवश्यक घटक नसून ते अप्रमाणित असल्याचे पुढे आले. या गंभीर प्रकारात कृषी विभागाने दारव्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
शेतकऱ्यांना लुबाडणारे रामा फर्टिकेमचे संचालक अभिजित अरविंद नलवडे, शुभम अशोक बानखेडे, सचिन सी. रामसिंघानी, विकास रघुनाथ नलवाडे सर्व रा. पुणे यांचा या बोगस कृषी उत्पादनात समावेश आहे. दारव्हा येथील कृषी केंद्र चालक दिलीप अण्णासाहेब देशकरी यांच्यावर बोगस खत विकल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकाला या प्रकारचा संशय आल्यानंतर सागर कृषी केंद्र नेरचे सागर मांगुळकर , किसान एग्रो एजंसीचे सूरज राठोड नेर, आप्पास्वामी एग्रो एजंसीचे शुभम नाईक, आर्णी या सर्व कृषी केंद्रातून खताचे नमुने घेण्यात आले. हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीला पाठविले असता ते बोगस असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून या खतांचा पुरवठा करणाऱ्या रामा फर्टिकेम कंपनीचे संचालक आणि खत विक्री करणारे कृषी केंद्र चालक यांच्यावर दारव्हा उपविभागीय कृषी अधिकारी विजय सरोदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
आणखी वाचा-नागपुरात डेंग्यूच्या तुलनेत चिकनगुनियाचे रुग्ण चारपट, ही काळजी आवश्यक…
भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. नेर येथील पवार कृषी केंद्राचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला आहे. तर बिलावर तफावत आढळल्याने महागाव येथील स्वराज अॅग्रो एजन्सीचा पराना दोन महिन्यांसाठी निलंबित केला आहे. यासोबतच ज्या कृषी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल झाले, त्या तिघांचाही परवाना निलंबित करण्यात आला आहे.
शेतकरी अनेक समस्यांचा सामना करीत असताना त्याला दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध होत नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या पिचला जात आहे. जिल्ह्यात बोगस खत विक्रेत्यांचे मोठे नेटवर्क सक्रिय झाले आहे. यासोबतच आर्णी आणि नेरमध्ये देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. या संपूर्ण प्रकरणात गुणवता नियंत्रण विभागानेही तपासणी मोहीम हाती घेतली आहे.