नागपूर : जनगणनेचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात घरगणना करण्यात आल्यानंतर आता प्रत्यक्ष जनगणना करण्यात येत आहे. हिमाच्छादित प्रदेशात दुसऱ्या टप्प्यातील जनगणनेचे काम सुरू झाले. देशातील इतर प्रदेशात हे काम फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यात घरगणना करताना एससी,एसटीचाच समावेश होता. ओबीसींच्या नोंदीसाठी रकाना नसल्याने मोठा विरोध झाला. ओबीसीची जनगणना होणार नसल्याची शंका उपस्थित करण्यात आली. त्यामुळे आंदोलनही करण्यात आले. आता प्रत्यक्ष जनगणना सुरू झाली. परंतु यातही ओबीसीसाठी स्वतंत्र रकाना नाही. त्यामुळे जातनिहाय जनगणना होणार नसल्याचे चित्र आहे. ओबीसी हा विषय समाज कल्याण विभागाशी संबंधित आहे. परंतु केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांना याची माहिती नाही.
आठवले म्हणाले जनगणना विभागाशी बोलेल..
हिमाच्छादित प्रदेशात जनगणनेचे काम सुरू झाले आहे. जनगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या अर्ज नमुन्यात एससी,एसटीचा रकाना असून ओबीसीमधील जातींच्या नोंदीसाठी स्वतंत्र रकाना नसल्याची बाब समोर आली आहे. याचा ओबीसी संघटनांकडून विरोध होत आहे. अनेकांनी आंदोलनाची तयारी केली असून हा प्रकार ओबीसींसोबत घात असल्याचा आरोप होत आहे. यावर केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, एससी,ओबीसी हा विषय माझ्याशी संबंधित आहे. त्यांचे हितजोपासने माझे काम आहे. जातनिहाय जनगणना करण्याबाबत सरकारने कायदा केला आहे. त्यामुळे ओबीसींचीही जनगणना होईल. ओबीसींसाठी स्वतंत्र रकना नसल्याची माहिती आपल्याला नाही. दिल्लीत गेल्यावर जनगणना विभागाशी बोलून याची माहिती घेईल, असे ते म्हणाले.
कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यास आनंद, परंतु मिळणार नाही..
नागपुरात पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतो. हा सर्वस्वी अधिकार प्रधानमंत्र्यांचा आहे. मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल. माझा एकही खासदार नाही. परंतु मला राज्यमंत्री पद मिळाले आहे. मी राज्यमंत्री पदावर आनंदी आहे. परंतु कॅबिनेट मिळाल्यास अधिक आनंद होईल. परंतु ते मिळणार नसल्याचे आठवले म्हणाले. शरद पवार यांनी एनडीए सोबत आले पाहिजे, असे ते म्हणाले.
माझ्याकडे जबाबदारी मिळाल्यास दीक्षाभूमीचा वाद मिटवतो
दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये अध्यक्ष पदावरून वाद सुरू आहे. राजेंद्र गवई व भंत सुरेई ससाई यांच्यात वाद सुरू आहे. हा वाद मिटला पाहिजे. माझ्याकडे जबाबदारी दिल्यास मी वाद मिटवेल, असे ते म्हणाले.
दिपकेंनी आरपीआयला पाठिंबा द्यावा
अभिजीत दिपकेंच्या मागण्या रास्त होत्या. सरकारने त्याची दखल घेतली. मागण्या मान्य केल्या. आंदोलन शांततेच्या मार्गाने केल्यास पोलीस लाठीहल्ला करीत नाही. परंतु दिल्लीत झाले. विद्यार्थ्यांनी आंदोलन उग्र केल्याने लाठीहल्ला करावा लागला. याची चौकशी होत असून दोषींवर कारवाई होईल, असे ते म्हणाले. दिपके हे आंबेडकरवादी आहेत. त्यांनी आरपीआयला पाठिंबा द्यावे, असे ते म्हणाले.
