बुलढाणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अख्त्यारीतील गृह विभागात मागील काही दिवसांत नाट्यमय घडामोडी घडल्या. याचा केंद्रबिंदू बुलढाणा जिल्हा होता. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची अमरावती एसआरपीएफ गट क्रमांक ९ येथे बदली करण्यात आली. या बदली आदेशावर केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणाने (कॅट) स्थगिती दिली आहे. २२ मे २०२५ रोजी राज्यातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते.

बुलढाणा पोलीस अधीक्षक पानसरे यांची अमरावती येथे बदली करण्यात आली. नागपूर सीआयडीचे पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. तांबे यांनी अनेक तासांचा प्रवास करून बुलढाणा गाठले. आदेश जारी झाल्याच्या तारखेलाच, म्हणजे २२ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. दुसरीकडे, पानसरे यांनी थेट ‘कॅट’मध्ये जात या बदलीला, अप्रत्यक्षपणे गृह मंत्रालयालाच आव्हान दिले. न्या. रंजित मोरे (अध्यक्ष, कॅट) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. ‘कॅट’ने त्यांच्या बदलीला तूर्तास स्थगिती दिली. प्रकरणातील चार प्रतिवादींनाही नोटीस पाठविण्यात आली होती, अशी माहिती आहे.

पानसरे यांनी ३१ ऑगस्ट २०२४ रोजी बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. केवळ नऊ महिन्यांचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींनुसार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली केली जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद पानसरे यांच्या वकिलांनी केला. तसेच बदली आदेशात कोणतेही सबळ कारण नमूद नसल्यामुळे हा आदेश मनमानी स्वरूपाचा असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.

याप्रकरणी केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणाने अर्ज दाखल करून घेत प्रतिवादींना नोटीस बजावली असून, बदलीला स्थगिती दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कार्यकाळ पूर्ण न होणे आणि जिल्ह्यात अशी कोणती आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली की त्यामुळे पानसरेंची बदली करण्यात आली, या दोन मुद्यांवर युक्तिवाद झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बदली आदेशात स्पष्ट कारण नसल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. आता हे प्रकरण कोणते वळण घेते याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, बुलढाण्याचे नवे पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी २२ फेब्रुवारी रोजी रात्रीच पदभार स्वीकारला आहे. २०१८ बॅचचे ते आयपीएस अधिकारी आहेत.