लोकसत्ता टीम
नागपूर: शहरात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला आहे. बाजारातील गोडाऊनच्या बाहेर ठेवण्यात आलेले हजारो धान्याचे पोते अवकाळी पावसामुळे खराब झाले असून त्यात शेतकरी व व्यापारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात व शहरात पावसाची शक्यता व्यक्त केल्यानंतर कळमना बाजारात मोठ्या प्रमाणात गोडाऊनच्या बाहेर गहू, सोयाबीन, तूर डाळीचे हजारो पोते ठेवण्यात आले होते. रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे गोडाऊन बाहेर ठेवण्यात आलेले व्यापाऱ्यांचे धान्य भिजले. बुधवारी लिलावाच्या वेळी धान्य पोत्यात भरून ठेवण्यात आले होते. काही धान्य ताडपत्रीने झाकण्यात आले होते तर हजारो पोते उघड्यावर ठेवण्यात आले होते. त्यात उघड्यावर ठेवण्यात आलेले पोते भिजले असून त्यातील धान्य खराब झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
आणखी वाचा- आदेश धडकले, ‘एसटी’त आजपासून महिलांना ‘हाफ’ तिकीट
अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात कळमना बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणखी दोन ते तीन दिवस पाऊस असताना या भिजलेल्या धान्याला आता भाव मिळणार नाही. एका शेतकऱ्याने चना, गहू विक्रीसाठी आणले होते. पण, रात्री पाऊस आला. त्यात हे धान्य भिजले आहे. त्यामुळे या भिजलेल्या धान्याला योग्य भाव कसा मिळणार, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजाकडे दुर्लक्ष
कळमना बाजार समितीत दररोज शंभरपेक्षा जास्त ट्रक धान्य येत असताना त्या तुलनेत बाजार परिसरात केवळ धान्यासाठी केवळ ३ गोडाऊन आहेत, येथे शेतकऱ्यांकडून आलेले धान्य ठेवण्यात आले असताना व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल गोडाऊनच्या बाहेर ठेवण्यात आला. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला असतानाही व्यापाऱ्यांनी धान्य झाकून का ठेवले नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.
कळमना बाजारात मोठ्या प्रमाणात धान्य येत असताना त्या प्रमाणात गोडाऊनची संख्या कमी आहे. दोन गोडाऊनच्यामध्ये मोकळ्या जागेत ‘डोम’ तयार करण्याबाबत अनेकदा समितीला निवेदन दिले. मात्र, समितीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे उघड्यावर ठेवण्यात आलेले धान्य भिजले आहे.
–सारंग वानखेडे, अध्यक्ष, कळमना धान्य बाजार असोसिएशन