scorecardresearch

वेकोलि अधिकाऱ्याच्या घर, कार्यालयावर सीबीआयचा छापा

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या (वेकोलि) एका अधिकाऱ्याच्या नागपुरातील घरावर आणि उमरेड येथील कार्यालयावर मंगळवारी सकाळी सीबीआयने छापा घातला.

वेकोलि अधिकाऱ्याच्या घर, कार्यालयावर सीबीआयचा छापा
(संग्रहित छायाचित्र)

नागपूर : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या (वेकोलि) एका अधिकाऱ्याच्या नागपुरातील घरावर आणि उमरेड येथील कार्यालयावर मंगळवारी सकाळी सीबीआयने छापा घातला. या छाप्यात सीबीआयने अनेक महत्त्वपूर्ण दस्तावेज जप्त केले. मनोज पुनिराम नवले (नागपूर) असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. सीबीआयच्या छाप्यामुळे वेकोलिच्या काही लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज नवले हे बल्लारपूर-चंद्रपूर येथील वेकोलिमध्ये नियोजन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नवले यांच्याकडे कोळसा खदान प्रकल्पाच्या शेतजमिनीबाबतची अनेक प्रकरणे आहेत. पैसे घेतल्याशिवाय कोणतीच कामे नवले करीत नसल्याची अनेकांची ओरड होती. नवले यांनी मंजुरी दिलेल्या काही शेतजमिनीच्या अधिग्रहण प्रकरणात कोट्यवधींची कमाई केल्याची माहिती होती. त्यामुळे नवले यांनी गैरकायदेशीर मार्गाने कमावलेली संपत्ती जास्त असल्याची तक्रार सीबीआयकडे प्राप्त झाली होती.

हेही वाचा >>> शिक्षक मतदारसंघ; प्रमुख नेत्यांशी फडणवीस यांच्या बैठकीनंतर भाजप उमेदवाराबाबत उत्सुकता वाढली

सीबीआयचे पोलीस उपनिरीक्षक एम. एस. खान यांनी २९ डिसेंबर २०२२ ला गुन्हा दाखल केला होता. नवले यांना नोटीस देऊन घराची आणि कार्यालयाची झडती घेण्यात आली. नवले यांना कार्यालयात जाण्यास मनाई करण्यात आली असून त्यांच्या घरासमोर सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहे. नवले यांच्या खुल्या चौकशीत सीबीआयला लाखोंमध्ये गैरव्यवहार केल्याचे आढळून आले आहे. नवले यांच्याकडे ६७ लाख ७ हजार रुपये एकूण कमाईच्या अतिरिक्त रक्कम आढळून आली आहे. त्यामुळे सीबीआयने नेवले यांना ताब्यात घेतले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 11:44 IST

संबंधित बातम्या