मेडिकलच्या अ‍ॅन्टी रॅगिंग कमिटीकडून शिक्कामोर्तब

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या वसतिगृहासह इतर भागात नवीन सीसीटीव्ही कॅमेरे लावून विद्यार्थ्यांच्या रॅगिंगवर नजर ठेवली जाणार आहे. याप्रसंगी कुणी वरिष्ठ विद्यार्थी नवीन विद्यार्थ्यांसोबत गैरप्रकार करताना आढळल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल. या निर्णयावर मंगळवारी झालेल्या  मेडिकलच्या अ‍ॅन्टी रॅगिंग कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

केंद्र व राज्य शासनासह सर्वच विद्यापीठ व स्थानिक महाविद्यालय प्रशासन प्रत्येक वर्षी नवीन विद्यार्थ्यांवर होणारी ‘रॅगिंग’ रोखण्याकरिता विविध उपक्रम राबवते, परंतु त्यानंतरही काही ठिकाणी हा प्रकार होतच असल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार टाळण्याकरिता नागपूर मेडिकलमधील अ‍ॅन्टी रॅगिंग समितीकडून २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात विविध पावले उचलण्याचा निर्णय झाला. त्यानुसार मेडिकलच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या प्रत्येक वसतिगृहात आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाईल व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हालचालीवर नजर ठेवली जाईल. विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने वागताना आढळल्यास तातडीने त्याच्यावर कारवाई होईल. चौकशीत विद्यार्थी दोषी आढळल्यास त्याला महाविद्यालयातून बडतर्फही केले जाईल. प्रत्येक दिवशी मेडिकलच्या वेगवेगळ्या विभागातील प्राध्यापक, सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांसह इतर अधिकारी सर्व वसतिगृहाचे कोणत्याही वेळी निरीक्षण करतील. विद्यार्थ्यांशी संवाद साधून ‘रॅगिंग’ विषयी माहिती घेतील. शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे लागेल. त्यात कुणात नैराश्य दिसल्यास त्याची प्रशासनाला त्वरित माहिती द्यावी लागेल. या विद्यार्थ्यांना मग मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला दिला जाईल. मेडिकलमध्ये रॅगिंग होऊ नये म्हणून विशिष्ट प्रकारचे जनजागृतीपर फलक व पत्रके सर्वच प्रमुख सूचना फलकांवर लावल्या जाईल. त्यात कुणाला रॅगिंग संबंधित तक्रार करायची असल्यास संबंधितांचे मोबाईल क्रमांकही दिले जाईल. या विद्यार्थ्यांचे नाव प्रशासनाकडूनही गुप्त ठेवण्यात येईल. इतरही काही महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आले. मेडिकलच्या बैठकीला प्रभारी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, डॉ. दिनकर कुंभलकर, डॉ. उदय नारलावार यांच्यासह मेडिकलच्या सगळ्याच विभागाचे प्रमुख व रॅगिंग समितीचे सदस्य उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक सत्राचा शुभारंभ शुक्रवारी

मेडिकलमधील एमबीबीएसच्या प्रथम वर्षांचे नवीन सत्र शुक्रवार ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. याप्रसंगी प्रवेश घेतलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. मेडिकलमध्ये एमबीबीएसची विद्यार्थी क्षमता २०० असून या सगळ्या विद्यार्थ्यांना पहिल्याच कार्यक्रमात कुणी रॅगिंग घेत असल्यास तातडीने प्रशासनाला सूचना देण्याचे आवाहनही करण्यात येणार आहे.