अनिल कांबळे
नागपूर : संयुक्त कुटुंब पद्धतीचा ऱ्हास झाल्याने कौटुंबिक वादांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पती-पत्नीच्या संसारात कुटुंबातील अन्य सदस्यांचा हस्तक्षेप नको असल्यामुळे अनेकांचा संसार उद्ध्वस्त होत आहे. कौटुंबिक वादाच्या अनेक तक्रारी ‘भरोसा सेल’मध्ये येतात. त्यांचे समुपदेशन केल्या जाते. मात्र, तक्रारकर्त्यां १०० पैकी ७० टक्के महिलांना केवळ घटस्फोटच हवा असतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पूर्वीच्या काळात संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे मोठय़ांचा मान-पान, आदर-सत्कार व्हायचा. आता काळ बदलला असून नोकरी, शहराचे आकर्षण आणि शिक्षणामुळे विभक्त कुटुंब पद्धत रुजली आहे. लग्नानंतर केवळ राजा-राणीचा संसार थाटण्यातच धन्यता मानणाऱ्या आजच्या महिलेला घरात सासू-सासरे नकोसे झाले आहेत. लग्न होत नाही तोच वेगळा संसार थाटण्यावर नवविवाहितेचा जोर असतो. पतीही संसार तुटू नये म्हणून पत्नीच्या हट्टापोटी सख्ख्या आई-वडिलांपासून वेगळा राहू लागतो. त्यामुळे माता-पित्यांची हेळसांड होते.
सासू-सासरे घरात असल्यामुळे अनेकांच्या कुटुंबात वारंवार खटके उडतात. पत्नीचा तगादा असतानाही पती आपल्या आई-वडिलांपासून दूर होण्यास तयार नसतो. यामुळे प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत जाते. आई-वडील किंवा पत्नी यापैकी एकाची निवड करण्याची अट काही महिला ठेवतात. अशी अनेक प्रकरणे ‘भरोसा सेल’मध्ये येतात.
वृद्ध सासू-सासऱ्यांना अश्लील शिवीगाळ, मारहाण, उपाशी ठेवणे किंवा खोलीत डांबून ठेवण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. कुटुंबात वाद झाल्यानंतर थेट पोलीस ठाण्यात तक्रार केली जाते. त्यानंतर ही प्रकरणे ‘भरोसा सेल’मध्ये समुपदेशनासाठी येतात. अनेक प्रकरणांमध्ये विवाहिता घटस्फोटाचीच मागणी करीत असल्याचे उघडकीस आले आहे.
अनैतिक संबंध संसारात अडथळा
लग्नानंतर अनेक पती-पत्नींमधील विश्वास लयास जातो. सुखी संसारात अनैतिक संबंध अनेकदा अडचणीचे ठरतात. लग्नापूर्वीच्या प्रकरणाची माहिती मिळाल्यास दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेतात. प्रेमविवाहाच्या अगदी सहा महिन्यांतच जोडीदाराच्या मनात कुणीतरी दुसरा किंवा दुसरी आल्यामुळे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहचते.
महिला कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या
भरोसा सेलमध्ये दैनंदिन तक्रारींचा ओघ लक्षात घेता महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि समुपदेशकांचीही संख्या फारच कमी आहे. कुटुंबसंस्था टिकवण्यासाठी प्रत्येक तक्रारींकडे गांभीर्याने बघावे लागते. त्यामुळे अनेक तक्रारी लवकर निकाली निघत नाहीत. भरोसा सेलमधील कर्मचाऱ्यांसी संख्या वाढवल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतील.
तक्रार निवारण शिबिराची गरज
भरोसा सेलमधील प्रलंबित प्रकरणांची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गांभीर्याने दखल घेत सहा महिन्यांपूर्वी तक्रार निवारण शिबीर आयोजित केले होते. शिबिरात स्वत: आयुक्तांनी महिलांच्या तक्रारी ऐकून ताबडतोड निर्णय घेतले. यामुळे पुन्हा एकदा तक्रार निवारण शिबिराची गरज निर्माण झाली आहे.
अनेक तक्रारदार महिला कौटुंबिक वादानंतर घटस्फोटाचा निर्णय घेतात. परंतु, भरोसा सेलकडून त्यांचे समुपदेशन आणि तक्रारींचे समाधान करण्यात येते. मात्र, काही महिला तडजोड न झाल्यास थेट घटस्फोटाचा विचार करतात, अशी बरीच प्रकरणे आमच्याकडे आली आहेत. – सीमा सुर्वे (पोलीस निरीक्षक, भरोसा सेल)
तक्रारींचा ओघ
वर्ष तक्रारी
२०१९ १६४९
२०२० १४३८
२०२१ २०५०
२०२२ (एप्रिल) ६४०

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cell statistics family disputes women complainants uparajdhani want compromise want divorce amy
First published on: 23-05-2022 at 17:07 IST