पावसाळ्यात तलावाचे स्वरूप; कंत्राटदार व प्रशासनाची चालढकल

नागपूर : चारही बाजूने सिमेंट रस्ते तयार झाल्याने शहरातील अनेक चौकात खड्डे तयार झाले असून पावसाळ्यात त्यात तळे साचत आहे. या खड्डय़ांमुळे वाहनेही चौकातून उसळत असून हे खड्डे अपघातप्रवण स्थळ बनले आहेत.

गेल्या सात वर्षांपासून शहरात सिमेंट रस्त्यांचे काम सुरू आहे. अनेक रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. काही भागात सिमेंट रस्त्यांचे बांधकाम अजूनही सुरू  आहेत. पण, या सिमेंट रस्त्यांमुळे एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. शहरातील अनेक भागात चारही बाजूने सिमेंट रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. पण, चौक तसाच सोडलेला आहे. यात प्रामुख्याने बजाजनगर, आकाशवाणी चौक, माटे चौक, शंकरनगर चौक, काँग्रेसनगर चौक, चिल्ड्रेन पार्क चौक, आणि बैद्यनाथ चौकाचा समावेश आहे. याशिवाय शहरात इतरही भागात ही समस्या  आहे. सिमेंट रस्त्यांचे बांधकाम करीत असताना त्यात पदपथापासून ते चौकातील कामांचाही समावेश असतो. पण, कोणीच कंत्राटदार चौकातून सिमेंट रस्ता व गट्टचे काम करीत नाही. त्यामुळे चारही बाजूला सिमेंट रस्ता व चौकाच्या मधोमध खड्डा पडलेला दिसतो. दरवर्षी पावसाळयात यात पाणी साचते. वाहनचालकांना रस्ता समतोल असल्याचा भास होतो.  वाहने चौकातून जाताना उसळतात. अनेकदा अपघात होतात. प्रशासनाचे या बाबीकडे दुर्लक्ष  आहे. कोणीच ही चूक दुरुस्त करण्याची जबाबदारी स्वीकारत नाही.

शहरातील रस्ते व वाहतुकीसंदर्भात उच्च न्यायालयात एक जनहित याचिका प्रलंबित आहे. चौकातील खड्डयांचा विषय उच्च न्यायालयात चर्चेला यावा, त्यावर तोडगा निघावा, अशी गरज निर्माण झाली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.