Census 2027: अकोला : जनगणना – २०२७ अंतर्गत घर यादी व घरगणना प्रक्रिया यंदा डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार आहे. जनगणना प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणकांकडून नागरिकांच्या घर यादी व घरगणनेची आवश्यक नोंद करण्यात येणार आहे. आजपासून या प्रक्रियेला प्रारंभ झाला.

घरभेटीतून माहिती संकलित

१६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत नियुक्त प्रगणक घरभेटी देऊन माहिती संकलित करणार आहेत. ज्या नागरिकांनी स्वगणना केली आहे, त्यांनी एसई आयडी आलेल्या प्रगणकांना द्यावा लागेल. प्रगणक भरलेली माहिती तपासून सबमिट करतील. या प्रक्रियेदरम्यान शासनाने निर्धारित केलेल्या जनगणनेसंदर्भातील ३३ प्रश्नांची माहिती नागरिकांना प्रगणकांना द्यावी लागणार आहे. या माहितीच्या आधारे संबंधित नागरिकांची नोंद जनगणनेच्या एचएलओ ॲपवर करण्यात येणार आहे.

उपलब्ध सुविधा, मालमत्ता, साहित्यासह विविध बाबींची माहिती विचारली जाणार

घर यादी व घरगणना प्रक्रियेत इमारत व घर क्रमांक, कुटुंबातील सदस्यांची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग व प्रवर्ग, राहण्याच्या खोल्यांची संख्या, विवाहित जोडप्यांची संख्या, उपलब्ध सुविधा, मालमत्ता, साहित्य आदी विविध बाबींची माहिती विचारली जाणार आहे. या सर्व माहितीच्या आधारे घर यादी व घरगणनेचे काम डिजिटल स्वरूपात पूर्ण करण्यात येईल. तसेच जनगणना – २०२७ संदर्भातील नागरिकांची माहिती पूर्णपणे गोपनीय व सुरक्षित ठेवली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

२१७४ एचएलबी तयार

वाशीम जिल्ह्यातील नागरिकांनी जनगणना – २०२७ च्या टप्पा क्रमांक १ मध्ये सक्रिय सहभाग नोंदवून दि. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत होणाऱ्या घर यादी व घरगणना प्रक्रियेसाठी नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षकांना आवश्यक माहिती देऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे. जिल्ह्यासाठी एकूण २१७४ एचएलबी तयार करण्यात आले असून, या कामासाठी एक मास्टर ट्रेनर, ४२ फिल्ड ट्रेनर, २२१८ प्रगणक आणि ३७८ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जनगणना – २०२७ अंतर्गत घर यादी व घरगणनेचे काम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. भविष्याच्या दृष्टीने जनगणना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आगामी काळातील शासकीय योजना राबवताना या माहितीचा आधार घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने अचूक माहिती देणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.