नागपूर : देशात जनगणनेचे कार्य सुरू असताना केंद्र सरकारने प्रगणक म्हणून काम करण्यासाठी खासगी व्यक्तींची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सरकारी कर्मचार्‍यांसह सरकारला योग्य वाटणार्‍या अन्य व्यक्तींनाही प्रगणक म्हणून नियुक्त करता येणार आहे. मात्र, या बदलामुळे जनगणनेची अचूकता, गोपनीयता आणि राजकीय हस्तक्षेप याविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील महारजिस्ट्रार कार्यालयाने १६ ऑक्टोबर रोजी जनगणना (सुधारणा) नियम, २०२६ अधिसूचित केले. या अधिसूचनेद्वारे जनगणना नियम, १९९० मधील प्रगणकांच्या पात्रतेसंबंधीच्या तरतुदींमध्ये बदल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश प्रशासनाला प्रगणक म्हणून काम करण्यासाठी योग्य वाटेल अशा कोणत्याही व्यक्तीची निवड करण्याची मुभा देण्यात आली आहे. खासगी प्रगणकांची निवड कोणत्या निकषांवर होणार, त्यांना कोणते प्रशिक्षण दिले जाणार आणि त्यांच्या कामावर देखरेख कशी ठेवली जाणार, याबाबत पारदर्शक व्यवस्था नसेल तर पक्षपाती निवड किंवा चुकीच्या नोंदींचा धोका निर्माण होऊ शकतो.

अलीकडेच काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी या बदलामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना जनगणनेच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा हेतू असल्याचा आरोप केला होता. जुलैमध्ये बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीचा आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या लोकसंख्याविषयक बदलांच्या उच्चस्तरीय समितीचा संदर्भ देत त्यांनी जनगणनेच्या निष्पक्षतेबाबत शंका उपस्थित केली होती. सकल ओबीसी महामोर्चाचे संयोजक उमेश कोर्राम यांनी नव्या नियमांना तीव्र विरोध केला आहे.

सरकारी कर्मचारी असताना गरज काय?

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या निर्णयावर टीका केली आहे. तलाठी, ग्रामसेवक आणि इतर सरकारी कर्मचारी उपलब्ध असताना खासगी व्यक्तींकडून जनगणनेचे काम करून घेण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, महाराष्ट्र जनगणना संचालनालयाच्या संचालक डॉ. निरुपमा डांगे यांना या बदलाच्या निकषाबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क केल्यावर त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. स्थानिक अधिकारीही हा केंद्राचा निर्णय असल्याची भूमिका मांडत थेट प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहेत.