|| देवेश गोंडाणे
आयुष स्नातकोत्तर प्रवेश परीक्षा

नागपूर : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) अंतर्गत आयुर्वेद महाविद्यालयातील प्रवेशासाठी १८ सप्टेंबरला होऊ घातलेल्या अखिल भारतीय आयुष स्नातकोत्तर प्रवेश परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना गुजरात व मध्यप्रदेशातील केंद्र देण्यात आले आहेत. केवळ चार दिवसआधी परीक्षेचे प्रवेशपत्र पाठवून दुसऱ्या राज्यात पेपर असल्याची माहिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.

पदव्युत्तर आयुर्वेद अभ्यासक्रमाच्या २२७४ जागांसाठी १८ सप्टेंबरला देशभरातील विविध केंद्रांवर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, अकोला, नागपूर, कोल्हापूर असे केंद्र देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरतानाही प्राध्यान्य क्रमानुसार राज्यातीलच पाच परीक्षा केंद्र निवडले होते. तरीही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये केंद्र देण्यात आले. इतर राज्यातील विद्यार्थ्यांनाही महाराष्ट्राचे केंद्र देण्यात आले आहे.

परीक्षा सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ अशा दोन सत्रात होणार आहे. एनटीने परीक्षेचे प्रवेशपत्र चार दिवसांपूर्वी दिले. त्यामुळे रेल्वेचे आरक्षण मिळवणे, तेथे निवास, प्रवासाची व्यवस्था अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. शिवाय दुसऱ्या राज्यात जाण्याआधी करोनाची चाचणी व इतरही विविध नियम आहेत. शिवाय प्रवासामुळे विद्यार्थ्यांना करोना होण्याचा धोकाही आहेच. अशा कठीण काळात एनटीएने दुसऱ्या राज्यात परीक्षेचे केंद्र दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

‘आयुष’साठीच बाहेरचे राज्य का?

नुकत्याच झालेल्या नीट, जेईई परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र देण्यात आले होते. ही परीक्षाही एनटीएतर्फेच घेण्यात आली. मात्र, ‘नीट’ परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना त्यांच्या नजीकचे केंद्र दिले असताना आयुष स्नातकोत्तर प्रवेश परीक्षेसाठीच बाहेर राज्यात केंद्र का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

करोना काळात परीक्षेच्या चार दिवसआधी दुसऱ्या राज्यात परीक्षा केंद्र देणे अन्यायकारक आहे. परीक्षा केंद्राचे प्राधान्यक्र म मागूनही त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास देण्याचा हा प्रकार आहे. याचा परीक्षा एजन्सीने विचार करावा.          – डॉ. संजय खडक्कार, शिक्षणतज्ज्ञ.