नागपूर : केंद्र सरकारने चांदी आयात नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला असून काही प्रकारच्या सिल्व्हर बारची आयात आता ‘मुक्त’ श्रेणीतून ‘निर्बंधित’ श्रेणीत टाकण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे अशा चांदीच्या आयातीसाठी केंद्र सरकारची विशेष परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी ही माहिती दिली. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.

नेमका काय बदल करण्यात आला?

काही विशिष्ट संकेतांकांअंतर्गत येणाऱ्या चांदीच्या पट्ट्यांच्या आयात धोरणात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी या वस्तूंची आयात ‘मुक्त’ श्रेणीत होती. म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करून कोणतीही स्वतंत्र सरकारी मंजुरी न घेता आयात करता येत होती. आता या वस्तूंना ‘निर्बंधित’ श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे.

‘निर्बंधित’ श्रेणी म्हणजे काय?

एखादी वस्तू ‘निर्बंधित’ श्रेणीत टाकल्यानंतर तिच्या आयातीसाठी केंद्र सरकारकडून विशेष मंजुरी किंवा परवाना घेणे आवश्यक ठरते. त्यामुळे संबंधित वस्तूंच्या आयातीवर सरकारला अधिक नियंत्रण ठेवता येते.

कोणत्या प्रकारच्या चांदीवर हा नियम लागू होणार?

नव्या नियमांनुसार ९९.९ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक शुद्धतेच्या चांदीच्या पट्ट्यांवर हे निर्बंध लागू होणार आहेत. तसेच इतर काही प्रकारच्या चांदीच्या पट्ट्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे.

सरकारने हा निर्णय का घेतला?

देशात चांदीच्या आयातीत सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. आयात प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, अनावश्यक आयात नियंत्रणात ठेवणे आणि बाजारातील व्यवहारांवर अधिक देखरेख ठेवणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

या निर्णयाचा परिणाम कोणावर होणार?

चांदी आयात करणारे व्यापारी, सराफा व्यावसायिक आणि संबंधित उद्योगांवर या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे. आता आयातदारांना अतिरिक्त सरकारी मंजुरीसह विविध नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे आयात प्रक्रियेला अधिक वेळ लागू शकतो. तसेच चांदीच्या दरांवरही याचा काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आदेश कधीपासून लागू झाला?

परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढील सर्व आयातींना नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. या नियमांचा भारतातील चांदी आयातीवर काय परिणाम होणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.