शतकोत्तर रौप्यमहोत्सव जयंती वर्षांची सांगता दोन दिवसांवर

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षांनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देण्यात येणार होते. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांची सांगता १४ एप्रिलला होत असून त्यानिमित्त केंद्र व राज्य सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दीक्षाभूमीवर होणार आहे. मात्र, अद्यापही सामाजिक न्याय विभागाचे समाज उत्थान पुरस्कार जाहीर न झाल्याने विभागाच्या मानसिकेतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत.

डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले. राज्य सरकारनेही केंद्राच्या पावलावर पाऊल टाकत योजना राबविल्या. त्या अंतर्गत अनुसूचित जाती व जमाती, भटक्या विमुक्त आणि शारीरिक व मानसिकदृष्टया दुर्बल, वृद्ध, अपंग, कुष्ठरोगी आदींच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार देऊन गौरविण्याचा निर्णय झाला. हा पुरस्कार राज्यभरातील १२५ स्त्री-पुरुष सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात येणार होता. त्यासाठी २५ एप्रिल २०१६ ला राज्य सरकारने सर्व वृत्तपत्रांमधून जाहिरात प्रसिद्ध करून ३० एप्रिल २०१६ पर्यंत अर्ज मागविले होते. यासाठी राज्याच्या विविध भागातून सामाजिक न्याय विभागाकडे अर्ज आले. ही प्रक्रिया पूर्ण होऊन एक वर्ष होत आले असून डॉ. आंबेडकरांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष १४ एप्रिलला संपत आहे. मात्र, त्यांच्या नावाने जाहीर होणाऱ्या पुरस्कारांची अद्याप घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे सामाजिक कार्य करणाऱ्यांमध्ये सामाजिक न्याय विभागाविषयी प्रचंड नाराजी असून विभागाला कदाचित आपल्या कार्याचा विसर तर पडला नाही ना, अशी भावना व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव सुरेंद्र बागडे यांच्याशी दोनदा संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.