नागपूर : केंद्र सरकार आपल्या सर्व तपास यंत्रणांचा वापर करून राजकीय विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. यापूर्वी या तपास यंत्रणेचा असा वापर कधी झाला नाही, अशी टीका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.

गृहमंत्री झाल्यावर पाटील हे पहिल्यांदाच विदर्भाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी सकाळी त्यांनी दीक्षाभूमी येथे भेट दिली असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी  वळसे पाटील म्हणाले, केंद्र सरकार ज्याप्रमाणे तपास यंत्रणेचा वापर करून राजकीय विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे, हे योग्य नाही. आर्यन खान आणि नवाब मलिक यांच्या बद्दल बोलताना गृहमंत्री म्हणाले, ही दोन्ही प्रकरणे वेगळी आहेत. मलिक यांचे काही आक्षेप आणि तक्रारी एनसीबी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांबाबत आहेत. त्या संदर्भात ते बोलत आहेत. इतर लोकांचे जशा तक्रारी, आक्षेप शासकीय विभाग, मंत्र्यांच्या संदर्भात असतात त्यातलाच तो प्रकार आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यासंदर्भात वळसे पाटील म्हणाले, मी पोलिसांचे मनबोल वाढवण्यासाठी आलो आहे. त्यांच्या कोणत्या अडचणी आहेत ते समजून घेतल्या जातील आणि काय सुधारणा करता येईल, याची माहिती घेण्यात येईल. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील चौकशी आयोगाने अँटिला प्रकरणात त्यांनी माहिती लपवली असा ठपका ठेवला होता याबाबत वळसे पाटील म्हणाले, आयोगासंदर्भातील पूर्ण अहवाल आल्याशिवाय त्यावर बोलणे योग्य होणार नाही.