नागपूर : देशात वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ५२ वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूच्या सर्वाधिक घटना मध्य भारतातील वनक्षेत्रातील आहेत. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात एकूण ३० वाघ मृत्युमुखी पडले असल्याने दोन्ही राज्यातील वन्यजीव व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आकडेवारीनुसार मध्यप्रदेशात १९ वाघांचे मृत्यू झाले. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात ११ वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. याशिवाय कर्नाटकात पाच तर तमिळनाडू आणि आसाम येथे प्रत्येकी चार वाघांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक वाघसंख्येचे क्षेत्र म्हणून मध्य भारताची ओळख आहे. २०२२च्या गणनेनुसार देशातील एकूण ३,६८२ वाघांपैकी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र मिळून १,२२९ वाघांची नोंद आहे. मात्र, याच क्षेत्रात वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने हा विषय गंभीर ठरत आहे.

या दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणावर व्याघ्रप्रकल्प असतानाही वाघांच्या मृत्यूच्या घटना सातत्याने होत आहेत. यातही मध्यप्रदेशातील वाघांच्या मृत्यूंबाबत असंख्य प्रश्न आहेत. त्यामुळे वाघांसाठी असलेली संरक्षण व संवर्धन यंत्रणा पुरेशी सक्षम आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संरक्षित क्षेत्रातील मृत्यूसह संरक्षित क्षेत्राबाहेरील मृत्यूदेखील चिंताजनक आहेत. ५२ वाघांच्या मृत्यूपैकी तब्बल २५ मृत्यू हे बाहेरचे आहेत. त्यामुळे संरक्षित क्षेत्राबाहेर वाढणाऱ्या वाघांच्या मृत्यूच्या घटनांमुळे मानव-वाघ संघर्ष रोखण्यासाठीची उपाययोजना कितपत प्रभावी ठरत आहे, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

वाघांच्या निरीक्षणासाठी मध्यप्रदेशची प्रणाली यापूर्वी उत्कृष्ट मानली जात होती. वन्यजीव क्षेत्रातील वाघ प्रादेशिक विभागात गेला तर त्यांना सुचित करून वाघाचे निरीक्षण केले जात होते. तर महाराष्ट्रात मात्र सुरुवातीपासूनच ही यंत्रणा कमकुवत होती. मात्र, मध्यप्रदेशातील वाघांच्या मृत्यूसत्राने त्यांच्या या निरीक्षण प्रणालीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मृत्यूसंदर्भात वन्यजीव अभ्यासक अजय दुबे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

मृत्यूची कारणे नमूद नाहीत

वाघांच्या मृत्यूमागे नैसर्गिक कारणे, आपापसातील संघर्ष, शिकार, अपघात, मानव-वाघ संघर्ष ही कारणे प्रामुख्याने तपासली जातात. मात्र, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीत वाघांच्या मृत्यूमागील कारणे नमूद करण्यात आलेली नाहीत. जंगलातील कमी गस्त हे वाघांच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. फेब्रुवारीत गस्त वाढवावी लागते. मात्र, अलिकडे वरिष्ठ अधिकारी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणालीवर, डिजीटल प्रणालीवर अवलंबून आहेत. दुसरीकडे त्यांचा ग्रामस्थांशी संवाद नाही. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये सारखीच स्थिती आहे.

– अजय दुबे, ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक