नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या परखड आणि स्पष्ट मतांसाठी प्रसिद्ध आहे. यामुळे अनेकदा त्यांच्या समोर अडचणही निर्माण होते. परंतु, त्याला न जुमानत गडकरी कायम आपल्या मतावर स्पष्ट असतात. अनेकदा त्यांनी स्वपक्षालाही धडा दिलेला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी नागपुरात झालेल्या अशाच एका कार्यक्रमात त्यांनी भाजप नेत्यांचे कान टोचले.
भाजप हा जातीयवादी किंवा सांप्रदायिक पक्ष नाही. त्यामुळे भाजपमध्ये विविध जातींचे संघटन उभे करणे ही चूक आहे. मी माझ्या राजकीय जीवनात ही चूक केली होती. परंतु, यातून कुठलीही जात आपल्यासोबत जोडली जात नाही. जातीय संघटनांच्या अध्यक्षांना त्यांच्या जातीत कोणीही विचारणारा नसतो असाच अनुभव आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. महापालिका निवडणूक आली की, या विविध जातींच्या संघटनांचे पत्र उमेदवारीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे येतील. त्यावेळी त्यांना जातीय संघटना तयार करणे किती मोठी चूक होती हे कळून चुकेल, असेही गडकरी म्हणाले.
गडकरी म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा आपला परिवार आहे. येथील प्रत्येक कार्यकर्ता या परिवाराचा सदस्य आहे. पक्षातील प्रत्येकाने आपल्या मुलांवर प्रेम करावे. मुलांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करावे. परंतु, आपला कार्यकर्ता हा सुद्धा आपल्या परिवाराचा एक सदस्य आहे. याप्रमाणे त्याच्यावर प्रेम करा. मी आजपर्यंत कधीही स्वतःच्या मुलांसाठी तिकीट मागितली नाही, माझी मुलं राजकारणात नाही, त्यामुळे पक्षातील अनेकांची अडचण होते असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी भाजपच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.१९५२ पासून आजपर्यंत प्रतिकूल काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या समर्पणामुळे भाजपसाठी आजचा दिवस उजाडला आहे. याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. १९८० मध्ये भाजपची स्थापना झाली. त्यावेळी देशभर कार्यक्रम झाले. नागपुरात न्यु इंग्लिश हायस्कूलच्या मैदानात शांतीभूषण आणि राम जेठमलानी यांच्या उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता, अशी आठवणही गडकरी यांनी सांगितली.
पक्ष कार्यालय हे आपल्या घराप्रमाणे आहे. अनेकांनी त्यासाठी परिश्रम घेतले आहे. हे केवळ शहराचेच नव्हे तर जिल्हा आणि विदर्भाचे महत्त्वाचे कार्यालय ठरणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. बावनकुळे यांनी पक्षाने आतापर्यंत दीड कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण केल्याची माहिती दिली.